Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई विद्यापीठातून डी. लिट. ही पदवी मिळालेल्या सर सी. व्ही. रामन, दादाभाई नौरोजी, डॉ. स्वामीनाथन, जे. आर. डी. टाटा अशा मान्यवरांच्या यादीत आता उस्ताद झाकीर हुसैन यांचाही समावेश होणार आहे. जगविख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांना मुंबई विद्यापीठाकडून मानाची एलएलडी अर्थात डीलिट ही पदवी प्रादान केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. विविध क्षेत्रांत बहुमोल योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांना मुंबई विद्यापीठातर्फे बहुमानाची डीलिट ही पदवी देण्यात येते. उस्ताद झाकीर हुसैन यांना डीलिट देण्यात यावी याबाबत मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, ज्येष्ठ गायक सुरेश गायकवाड, संगीतकार शंकर महादेवन, अभिनेते मनोज जोशी, हॉटेल व्यावसायिक अमरजीतसिंग कोहली आणि उद्योजक रवींद्र आरेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केली. यानुसार मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर त्याला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे उस्ताद झाकीर हुसैन यांना डीलिट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली सहा दशके झाकीर हुसैन यांनी जगभरात तबलावादनाचे कार्यक्रम केले आहेत. पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचे फ्यूजन करण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला. भारतरत्न पं. रवीशंकर व झाकीर हुसैन यांचे वडील उस्ताद अल्लाखाँ साहेबांनी त्याचे कौतुक करून हा प्रयत्न पुढे नेण्यास प्रोत्साहन दिले. झाकीर हुसैन यांनी आजपर्यंत संगीतसेवा करत असताना हजारो मैफली रंगवल्या. त्यांचा गौरव हा केवळ त्यांचा व्यक्तिगत नसून, भारतीय शास्त्रीय संगीताही गौरव असेल, असे मत शिफारस करताना संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांनी मांडले. त्यांच्या या कार्याचा विचार करून व्यवस्थापन परिषदेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर आगामी दीक्षांत समारंभात त्यांना ही मानद पदवी प्रदान केली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vZPThw
via nmkadda