Advertisement

म. टा. प्रतिनिधी, पुणे अकरावी प्रवेशांसाठी यंदा प्रथमच घेण्यात येणारी सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) २१ ऑगस्टपर्यंत घेणार असल्याचे सूतोवाच राज्य माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी केले. सीईटीसाठी अर्ज प्रक्रिया १९ जुलैला सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. या पोर्टलची लिंक मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार असून, सीईटी द्यायची की नाही, हे विद्यार्थ्यांना ठरवता येणार आहे. राज्यातील सुमारे १६.५ लाख विद्यार्थ्यांचे दहावीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशांचे वेध लागले आहेत. त्याची प्रक्रिया राज्य माध्यमिक मंडळाकडून सुरू करण्यात आली असून, १९ जुलैपासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या वेबसाइटवरून सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे. याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून, वेबसाइटवर सीईटी पोर्टलची लिंक देण्यात येणार आहे. या लिंकवर विद्यार्थ्यांनी बैठकक्रमांक दाखल केल्यानंतर सीईटी द्यायची आहे की नाही, असे दोन पर्याय विचारले जातील. विद्यार्थ्यांनी दोन्हीपैकी एक पर्याय निवडून नोंदणी करायची आहे. सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा पर्याय निवडल्यानंतर त्यांचा परीक्षा अर्ज मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने दाखल होईल. प्रवेश परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने त्याची केंद्रे लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही मंडळाने स्पष्ट केले. सीईटी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारलेली असून, गणित, विज्ञान, इंग्रजी आणि समाजशास्त्र या चार विषयांमधील एकूण १०० प्रश्न विचारले जाणार आहेत. यासाठी अभ्यासक्रमातील काही भाग काढून स्वतंत्र अभ्यासक्रम दिला जाणार असून, तोही लवकरच जाहीर केला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा ताण हलका होणार असून, मंडळाने दिलेल्या अभ्यासक्रमाचाच सीईटीसाठी विचार केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 'सीईटी' दृष्टीक्षेपात - १९ जुलैला अर्ज प्रक्रिया सुरू होणार. - राज्य माध्यमिक मंडळाच्या वेबसाइटद्वारे 'सीईटी'साठी स्वतंत्र पोर्टल. - २१ ऑगस्ट पर्यंत परीक्षा घेण्यात येईल. - सीईटीसाठी वेगळा अभ्यासक्रम देणार. - सीईटी देणे बंधनकारक नाही. - सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश दुसऱ्या टप्प्यात. - सीईटी ऑफलाइन पद्धतीने होणार. अशी होणार परीक्षा... अकरावी प्रवेशांसाठी होणारी सीईटी ही दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. यासाठी इंग्रजी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र या विषयांची निवड करण्यात आली असून, प्रत्येक विषयाला २५ गुणांचे वेटेज देण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक विषयातील काही प्रकरणे एकत्र करून, अभ्यासक्रम निश्चिती केला जाईल. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने (एमसीक्यू) शंभर प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. सात हजार विद्यार्थ्यांचे काय होणार ? अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे किंवा त्यामध्ये अडथळे आल्याने राज्य माध्यमिक मंडळाने सुमारे सात हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. या विद्यार्थ्यांची मूल्यमापनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे माध्यमिक मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले असले, तरी या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3z8JgLS
via nmkadda