Advertisement

कोल्हापूर: करोनाच्या संकटामुळे शाळेत जाण्याचे थांबले, घरात बसूनच ऑनलाईन शाळा सुरू झाल्या. पण मोबाईलला रेंजच नसल्याने त्यांना शाळा शिकणेच अवघड झाले, अशावेळी शाळेतील मुलांनीच पुढाकार घेत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावरच ऑनलाइन शाळा सुरू केली, त्यासाठी त्यांनी तेथेच झोपडी बांधली. ही कथा आहे राधानगरी तालुक्यातील हेळेवाडी या गावची. वर्ष उलटले तरी करोनाचे संकट कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आकडा तर रोज वाढतच आहे. रोज दीड हजारावर बाधिन आढळत असल्याने लॉकडाऊन हटण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे शाळा कॉलेज सध्या बंदच आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. पण शाळेत न जाता ऑनलाइन शिकण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. पण ऑनलाईन शिकताना ग्रामीण भागातील मुलांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या मुलांनाच तर हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. यामुळे शिकायचे कसे हा प्रश्न त्यांना पडला आहे. राधानगरी तालुक्यातील वाड्यास्त्यावर इंटरनेट नसल्याने अनेकांचा सध्या नेटचा शोध सुरू आहे. मोबाईल रेंज नसल्याने काही दिवस हेळेवाडी गावातील मुलांना ऑनलाइन शाळेत सहभागी होता येईना. तेथूनच या मुलांनी रेंज कुठे येते का याचा शोध सुरू केला. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका डोंगरावर रेंज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मुलांची रोज तेथे पायपीट सुरू झाली. सकाळी लवकर डोंगरावर यायचे. सायंकाळपर्यंत थांबायचे आणि नंतर घरी परतायचे. असा नित्यक्रम सुरू झाला. काही दिवसात पावसाळा सुरू झाला. या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. पावसात कसे बसायचे म्हणून मुलांनी पालकांच्या मदतीने डोंगरावरच झोपडी मारली. गेले काही दिवस त्यांचा या झोपडीत बसूनच अभ्यास सुरू झाला आहे. राधानगरी तालुका हा डोंगराळ असून वाड्या वस्त्या मोठ्या प्रमाणात आहेत. गावापासून दहा किलोमीटर लांब असलेल्या गावठाणवाडी येथे बीएसएनएल चा टॉवर आहे. त्याची रेंज या डोंगरावर येत असल्याचे शिक्षणाची सोय झाली आहे. गावातील विद्यार्थी त्या छोट्याशा झोपडीत बसून ऑनलाइनचा अभ्यास करत आहेत. शाळेसाठी हा संघर्ष त्यांच्या वाटेला आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वप्नाली सुतार या मुलीनेही याच पद्धतीने संघर्ष करत डोंगरावर जाऊन अभ्यास केला. तिचा हा संघर्ष थेट पंतप्रधानांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर सरकारने तिच्या गावातच इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली. अशाच पद्धतीने शालेय आणि कॉलेज शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी गावागावात इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याची खरी गरज आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iaMzeQ
via nmkadda