Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार असलेल्या सीईटीची () तारीख ही राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी बोर्ड) इयत्ता दहावीचा निकाल () लागल्यानंतरच जाहीर केली जाईल', अशी माहिती राज्य सरकारतर्फे सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. सीईटी ही केवळ एसएससीच्या अभ्यासक्रमावरच आधारित असेल, असे स्पष्ट करणाऱ्या राज्य सरकारच्या २८ मे रोजीच्या अधिसूचनेला आयसीएसई बोर्डच्या दादरमधील आयईएस ओरायन स्कूलमधील अनन्या पत्की हिने तिचे वडील अॅड. योगेश पत्की यांच्यामार्फत रिट याचिका करून आव्हान दिले आहे. याविषयी न्या. रमेश धनुका व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 'राज्यात १६ लाख एसएससी बोर्डचे विद्यार्थी असून आयसीएसई व सीबीएसई बोर्डचे चार लाख विद्यार्थी आहेत आणि सीईटी ऑफलाइन होणार आहे. सीईटीचा अभ्यासक्रम २४ जून रोजी अधिसूचित करण्याता आला असून सीईटी जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे म्हटले जात आहे. परिणामी मी सीईटी देण्याच्या स्थितीत नाही. परंतु, सीईटीमधील गुणांनाच प्रवेशासाठी प्राधान्य आहे. त्यामुळे मला दहावीत उत्तम गुण मिळूनही सीईटीचे गुण नसतील तर मला मुंबईतील महत्त्वाच्या कॉलेजांऐवजी ठाणे, डोंबिवली, कल्याणमधील कॉलेजमध्ये जावे लागेल. हा पूर्णपणे भेदभाव आहे', असा युक्तिवाद अनन्यातर्फे मांडण्यात आला. तेव्हा, 'सीईटी केव्हा घेतली जाणार आहे?', अशी विचारणा खंडपीठाने केली. त्यावर 'दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सीईटीची तारीख जाहीर केली जाऊ शकत नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या आधी सीईटी होण्याची शक्यता कमी आहे', असे उत्तर सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी दिले. त्यानंतर खंडपीठाने सरकारचे हे विधान आपल्या आदेशात नोंदवून सध्या सीईटीला स्थगिती देण्याचा अंतरिम दिलासा देणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच याचिकेतील मुद्द्यांबाबत राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करावे, असे निर्देश देऊन याप्रश्नी पुढील सुनावणी २२ जुलै रोजी ठेवली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jIt5k9
via nmkadda