Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाकाळात मागील शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमात कपात केली होती. त्याचप्रमाणे यंदाही कपात करण्यात येणार आहे का? अंतिम परीक्षा नेमकी कशी होणार? अशा विविध मुद्यांवर राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त न झालेल्या नाहीत. विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वच संभ्रमात असल्याने मंडळाने लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे. कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने अर्थात आयसीएसई आणि आयएससी परीक्षांचा म्हणजेच अनुक्रमे दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अभ्यासक्रम कपात केली आहे. याचबरोबर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची मूल्यमापन पद्धत जाहीर करत अभ्यासक्रम दोन सत्रांमध्ये विभागला आहे. पहिल्या सत्रात ५० टक्के अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. या अभ्यासक्रमाची मंडळाकडून नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये ९० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यानंतर उर्वरित ५० टक्के अभ्यासक्रम दुसऱ्या सत्रात शिकविला जाणार आहे. याची परीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये दोन तासांची दीर्घोत्तरी प्रश्नांची घेतली जाणार आहे. यानंतर प्रथम सत्र आणि द्वितीय सत्राचे सरासरी गुण काढून विद्यार्थ्यांना अंतिम गुणदान केले जाणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही अशाप्रकारे दहावी व बारावीच्या अभ्यासक्रम आणि मूल्यमापन आराखडा वेळेत जाहीर करावा, म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास आणि शिक्षकांना अध्यापन करणे सुलभ होईल, अशी मागणी शिक्षक व मुख्याध्यापक करत आहेत. मागील वर्षी अचानक उद्भवलेल्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात आले होते. मात्र यंदाची परिस्थिती डोळ्यासमोर आहे. यामुळे राज्य शिक्षण मंडळाने अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीबाबत वेळीच मार्गदर्शन करावे. -महेंद्र गणपुले, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते 'अभ्यासक्रम कपात व्हावी' राज्यात संभाव्य तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत यंदाही शिक्षण ऑनलाइन सुरू केले आहे. ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून करोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याच्या सूचनाही सरकारने दिल्या आहेत. परंतू विद्यार्थी, पालक यांच्यावरील ताण लक्षात घेत यंदाही राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या अभ्यासक्रम कपातीचा विचार करावा, अशीही मागणी होत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r3pNcM
via nmkadda