Advertisement

म. टा. प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या 'सीईटी सेल'तर्फे फाइन आर्ट्स आणि डिझाइनच्या पदवी प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेची (CET) प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या विद्याशाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ जुलैपर्यंत प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहेत. या सीईटीअंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षांवर अधिक भर दिला जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी निवडलेल्या केंद्रावर ही सीईटी ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. राज्यातील सरकारी कला महाविद्यालये; तसेच खासगी महाविद्यालयांत फाइन आर्ट्स, डिझाइन अशा कलाशाखांत प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा उपयुक्त ठरणार आहे. यासाठी कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. या विद्यार्थ्यांना किमान ४५ टक्के गुण मिळणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांसाठी वयाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. तीन प्रात्यक्षिकांचे विषय आणि एक लेखी विषय, असे या परीक्षेचे स्वरूप असेल. यात डिझाइन प्रॅक्टिकल, ऑब्जेक्ट ड्रॉइंग प्रॅक्टिकल आणि मेमरी ड्रॉइंग प्रॅक्टिकल असे प्रात्यक्षिकांचे विषय असणार असून, प्रत्येक विषयासाठी ५० गुण देण्यात येणार आहेत. परीक्षेचा शेवटचा पेपर सामान्य ज्ञानाचा लेखी पेपर असून, ४० गुणांचा आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने (MCQ) हा लेखी पेपर घेतला जाणार आहे. परीक्षेचा अर्ज करून शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राची निवड करावी लागणार असून, याच केंद्रांवर प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही परीक्षा घेतली जाईल, असे संकेत 'सीईटी सेल'तर्फे देण्यात आले असून, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dVESaT
via nmkadda