
ईटी वृत्त, नवी दिल्ली/पुणे देशातील आयटी क्षेत्रात चालू आर्थिक वर्षात नोकऱ्यांचा सुकाळ निर्माण झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आघाडीच्या चार भारतीय कंपन्यांनी ४८,५०० कर्मचारी घेतल्यानंतर आता या कंपन्या पुन्हा एकदा मेगाभरती करण्याच्या तयारीत आहेत. ही सर्व मेगाभरती नवोदितांची करण्यात येणार आहे. कर्मचारी भरती पुढील १२ ते १८ महिने सुरू राहण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्राचा आकार सध्या १५० अब्ज डॉलरचा आहे. या क्षेत्रात गुणवत्ता असलेल्या तसेच कौशल्ये असलेल्या मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस, एचसीएल टेक व विप्रो या देशातील आघाडीच्या चार आयटी सॉफ्टवेअर निर्यातदार कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षात रोजगार देण्याचा सपाटा सुरू केला आहे. आता या कंपन्या प्राधान्याने भारतातून तब्बल एक लाख २० हजार नवे कर्मचारी घेणार आहेत. हे कर्मचारी नवोदित असल्यामुळे नव्याने आयटी क्षेत्रातील पदवी मिळवलेल्यांसाठी ही सुसंधी चालून आली आहे. या आघाडीच्या बड्या चार आयटी कंपन्या सोडल्यास, एलटीआय व माइन्ड ट्री यांसारख्या मध्यम आकाराच्या आयटी कंपन्याही चालू आर्थिक वर्षात शिक्षणसंस्थांतून नुकतीच आयटी पदवी प्राप्त केलेल्या किंवा शिकत असलेल्या नवोदितांना कामावर घेण्यास उत्सुक आहेत. नोकरभरती का? करोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसायांचे अधिकाधिक डिजिटायझेशन करण्याकडे कल वाढू लागला आहे. आघाडीच्या चार भारतीय आयटी कंपन्यांना यासाठी मोठी कंत्राटे मिळाली आहेत. प्रुडेन्शियल फायनान्शियल कंपनीचे कंत्राट 'टीसीएस'ला मिळाले असून, 'इन्फोसिस'ला 'डॅमलर' कंपनीचे कंत्राट निळाले आहे. 'विप्रो'ला 'मेट्रो एजी' कंपनीचे कंत्राट मिळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून या आयटी कंपन्यांनी नवोदितांची भरती थांबवली होती. आता मात्र ही नवी कंत्राटे जमेस धरता मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. केवळ नव्या कामांसाठीच ही नोकरभरती होत नसून सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवे कर्मचारी घेण्यासाठीही ही नोकरभरती केली जाणार आहे. - चालू आर्थिक वर्षात दीड लाख नवोदितांचा होणार भरणा - आघाडीच्या चार आयटी कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ४८,५०० कर्मचारी घेतले - यावर्षी आघाडीच्या चार आयटी कंपन्या घेणार १,२०,००० कर्मचारी - सध्या या कंपन्यांतून एकूण ११,६३,४०० कर्मचारी कार्यरत कर्मचारी घटण्याचे प्रमाण (टक्के) कंपनी -- प्रमाण टीसीएस -- ८.६ इन्फोसिस -- १३.९ विप्रो -- १५.५ एचसीएल टेक -- ११.८
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2W9iqFv
via nmkadda
0 टिप्पण्या