Advertisement

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनामुळे यंदाच्या दहावी निकालासाठी स्वतंत्र पद्धत अवलंबण्यात आली. शुक्रवारी जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात मुंबईतील ९९.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागात रायगड जिल्ह्याचा ९९.९९ टक्के इतका सर्वाधिक निकाल लागला. मुंबईत ३२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले. मुंबई विभागातून यंदा तीन लाख ४७ हजार ६६७ विद्यार्थी मूल्यांकनासाठी पात्र झाले होते. यापैकी ३२० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून तीन लाख ४७ हजार ५३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील एक लाख १० हजार ९७९ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून तर एक लाख ५९ हजार ८११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मुंबईतील दोन शाळांचा निकाल शून्य ते १० टक्क्यांदरम्यान लागला आहे. तर तीन हजार ७०६ शाळांचा निकाल १०० टक्के इतका लागला आहे. राज्यातील एकूण ९८.३२ टक्के शाळांचा निकाल हा १०० टक्के इतका लागला आहे. अठराव्यांदा दहावी उत्तीर्ण घाटकोपर येथील एका शाळेत एका ३८ वर्षीय विद्यार्थ्यांने अठराव्यांदा दहावीची परीक्षा दिली आणि यंदा ते उत्तीर्ण झाले आहेत. यापूर्वी या विद्यार्थ्यांने १७ वेळा दहावी परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रत्येकवेळी अपयश येत होते. तर १९९६मध्ये शिक्षण सोडलेल्या एका महिलेने यंदा दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केला होता, त्याही उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्हानिहाय निकालाची टक्केवारी ठाणे - ९९.९६ रायगड - ९९.९९ पालघर - ९९.९४ मुंबई शहर - ९९.९६ मुंबई पूर्व उपनगर - ९९.९४ मुंबई पश्चिम उपनगर - ९९.९७
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ktwG5K
via nmkadda