Advertisement
म.टा.प्रतिनिधी, नागपूर राज्यातील इंजिनीअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय (MHT CET Date 2021) येत्या २ ते ४ दिवसांत घेतला जाईल. ही परीक्षा घेण्यासाठी राज्यातील परीक्षा केंद्रे वाढवावी लागतील, असे उच्च शिक्षणमंत्री यांनी सांगितले. नागपुरात ते शनिवारी पत्रकारांशी बोलत होते. तसेच राज्यात येत्या काळात मराठी भाषा विद्यापीठाची निर्मिती करण्यात येईल. त्यासाठी ८ ते १० दिवसांत समिती स्थापन केली जाईल. या समितीचा अहवाल आल्यानंतर अनेक दिवसांची ही मागणी पूर्णत्वात नेण्यात येईल, अशी घोषणाही सामंत यांनी केली. प्राध्यापक भरतीचा मुद्दा मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. याबाबत, सध्याची परिस्थिती बघता सध्या थांबण्याची विनंती वित्त विभागाने केली आहे. येत्या सोमवारी प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत या विषयावर चर्चा होईल. प्रत्यक्ष कॉलेजेस सुरू करावयाचे असले तरी तरी अद्याप तिसर्या लाटेबाबत स्पष्टता आलेली नाही. सर्व कर्मचार्यांचे पूर्ण लसीकरण झाल्याशिवाय कॉलेजे सुरू करता येणार नाही. उच्च शिक्षण विभागाने छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्तीचे ३०१ कोटी देण्यात आले आहेत. ते तातडीने वितरित करण्यात येतील. खासगी कॉलेजांमधील शुल्क कमी करण्याबाबत चिंतामणी जोशी यांची समिती तसेच शुल्क नियमन समिती नेमण्यात आली आहे. याबाबतीत नागपूर विद्यापीठाचे सूत्र राज्यभरात राबविण्यास सांगितले आहे, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्र्यांनी दिली. नागपुरातील विविध शिक्षणसंस्थांच्या गरजांच्या पूर्ततेबाबत त्यांनी माहिती दिली. रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाला विस्तारासाठी जागा हवी आहे. त्यासंदर्भात, जिल्हाधिकार्यांना सूचना देण्यात आला आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानातील फॉरेन्सिक कॉलेज व इन्स्टिट्युट ऑफ सायन्स यांचे प्रत्येकी १ कोटी रुपये तर वसंतराव नाईक कॉलेजचे ४९ लाख रुपये परत गेले आहे. योग्य प्रस्ताव आल्यास हे पैसे त्यांना देण्यास येतील. याशिवाय, डीपीसीमधूनही या संस्थांना मदत करण्यात येईल, असेही सामंत म्हणाले. उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व करू शकतात भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना असहिष्णू म्हटले होते. मात्र, देशातील ते चौथ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते आहेत. लवकरच ते पहिल्या क्रमांकावर जातील. ते देशाचे नेतृत्व करू शकतात ही जाणीव झाल्याने काही लोकांचा पोटशूळ उठतो आहे, असे सामंत म्हणाले. ठाकरे आणि फडणवीत यांची भेट कदाचित आरक्षणाच्या प्रश्नावर झाली असेल. युती किंवा आघाडीचा निर्णय उद्धव ठाकरेच घेऊ शकतात आणि आम्ही सगळे त्यांच्या निर्णयाला बांधील आहोत, असेही त्यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38iIbps
via nmkadda