Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई विद्यापीठामध्ये (Mumbai ) संशोधनाला चालना मिळावी, यासाठी मार्च २०२१मध्ये झालेल्या अधिसभा बैठकीमध्ये पीएचडी प्रवेश परीक्षा (PET) वर्षातून दोन वेळा घेण्याचे प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मार्चमध्ये पहिली 'पेट' परीक्षा झाली. मात्र दुसऱ्या 'पेट' परीक्षेबाबत विद्यापीठाकडून अद्याप कोणतीही सूचना जारी करण्यात आली नाही. त्यामुळे वर्षातील दुसरी कधी घेण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठामध्ये संशोधनावर कमी भर दिला जातो. त्यातही ज्या विद्यार्थ्यांना संशोधन करून पीएचडी करायची असते, अशा विद्यार्थ्यांसाठी वर्षातून एकदाच 'पेट' परीक्षा घेण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अधिसभा सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी मार्चमध्ये ऑनलाइन झालेल्या अधिसभेमध्ये 'पेट' परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याची मागणी केली. यावर अधिसभा अध्यक्ष प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांनी 'पेट' परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचे मान्य केले. मार्च २०२१ मध्ये तीन वर्षांनंतर झालेल्या या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून तब्बल सहा हजार ५१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यामध्ये परराज्यातील ४६१ विद्यार्थ्यांचा समावेश होता. २०२१मधील पहिल्या 'पेट' परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र त्यानंतरही विद्यापीठाकडून या वर्षातील दुसरी 'पेट' परीक्षा घेण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरी 'पेट' परीक्षा कधी होणार, याबाबत विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांकडून विद्यापीठाकडे सातत्याने विचारणा होत आहे. मात्र अद्यापही पेट परीक्षेबाबत कोणताही निर्णय विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला नाही. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये व्हावी परीक्षा दुसऱ्या 'पेट' परीक्षेची तारीख जाहीर केल्यास मार्चमध्ये 'पेट' परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच नवीन विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीमध्ये सातत्य ठेवता येणार आहे. पीएचडीसाठी आवश्यक असलेल्या पेट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ही परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये घेण्यात यावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये परीक्षा झाल्यास संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे थोरात यांनी विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांना लिहिलेल्या विनंती पत्रात म्हटले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Bjyrrr
via nmkadda