Advertisement
मुंबई: शालेय अभ्यासक्रमात शेती या विषयाचा समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा, असा निर्णय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शिक्षणमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली. यासंबंधी शिक्षणमंत्री गायकवाड यांनी मंत्रालयात बैठक घेतली. कृषिमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह समग्र शिक्षणचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजित माने आदी या वेळी उपस्थित होते. सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग ०.९३ टक्के असून, तो तीन टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाचा समावेश केल्यास शेतीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होईल. त्याशिवाय शेतकऱ्यांविषयीची सामाजिक बांधिलकी निर्माण होतानाच ग्रामीण भागात कृषिसंशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळेल. शेतीला गतवैभव, प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाचा समावेश होणे आवश्यक असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांच्या वयानुसार शेतीशी निगडित संदर्भ त्यांना शिकविण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होऊन पीकउत्पादन पद्धतीत त्याचा उपयोग होऊ शकतो आणि शेतकऱ्यांची नवी पिढी शास्त्रीय पद्धतीने शेती करू शकेल. पर्यायाने उत्पादनात वाढ होण्यास नक्कीच मदत होऊ शकते, असेही ते म्हणाले. संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार शिक्षण व कृषी विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करण्याची कार्यवाही करणार आहे. विद्यार्थ्यांचे वय, त्याची बुद्धिमत्ता यांची सांगड घालून अभ्यासक्रम तयार करण्याच्या सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्याचे गांभीर्य विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्याबरोबरच जैव तंत्रज्ञानावर आधारित शेतीला चालना देण्याची गरज विद्यार्थ्यांमध्ये या शिक्षणामुळे निर्माण होईल, असे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BhWjvN
via nmkadda