
शिष्यवृत्ती परीक्षेला मुंबईत परवानगी नाही; अन्य ठिकाणचे काय? Rojgar News
बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१
Comment

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिकेने शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १२ ऑगस्टला होणारी शिष्यवृत्ती परीक्षा मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार नसल्याचे पालिका शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र शहरातील इतर खासगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय व्हावी यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून दरवर्षी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता ही परीक्षा १२ ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र आता करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची परीक्षा आयुक्तांच्या आदेशानुसार घेण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र आयुक्तांचे इतर आदेश पूर्ण मुंबईला लागू असतात, तर हा शिष्यवृत्ती परीक्षेचा आदेश का लागू नाही? असा प्रश्न उपस्थित करत इतर मंडळाच्या शाळांनी परीक्षा घ्यायची की नाही? त्यांना परीक्षेसाठी मुभा दिली आहे का? याबाबत स्पष्टता आणावी, अशी मागणी शिक्षक भारतीचे कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी केली आहे. पालिकेने निर्णय घेताना इतर खासगी, अनुदानित शाळांचा विचार का केला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईतून २४ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये पाचवीचे विद्यार्थी १३ हजार २९८, तर आठवीचे विद्यार्थी ११ हजार १७४ इतके आहेत. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पालिकेच्या शाळांमधून ८ हजार ८२५ विद्यार्थी, तर शिक्षण विभागाच्या तिन्ही विभागांशी संलग्न शाळांमधील १५ हजार ६४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या शाळांमधून नोंदणी केलेल्या ८,८२५ विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नसल्याचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी एक परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय पालिकेचे शिक्षक विद्यार्थ्यांची ऑनलाइन वर्गाद्वारे शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेत होते. ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास व तयारी केली त्यांच्यावर हा अन्याय नाही का, असा प्रश्न काही शिक्षकांनी उपस्थित केला आहे. या निर्णयामुळे एकाच वस्तीत व परिसरात राहणारे खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी या परीक्षेला बसणार आणि पालिका शाळेत शिकणारा विद्यार्थी मात्र परीक्षेला मुकणार, ही चुकीची बाब असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. संपूर्ण मुंबई विभागासाठी ही परीक्षा रद्द करून नंतर आयोजन करावे अथवा नियोजित वेळेत ही परीक्षा पार पाडावी, असेही काही शिक्षकांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yDbC1b
via nmkadda
0 Response to "शिष्यवृत्ती परीक्षेला मुंबईत परवानगी नाही; अन्य ठिकाणचे काय? Rojgar News"
टिप्पणी पोस्ट करा