Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ८०० कॉलेजांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, पहिली गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यंदा कटऑफ वाढला असला, तरी अर्जांची संख्या कमालीची घटल्याने काही कॉलेजांमध्ये प्रथमच 'वॉक इन' प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. सध्या जाणवत असलेली अनिश्चितता आणि विस्कटलेली आर्थिक घडी याचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबई विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदा गतवर्षीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेशपूर्व नोंदणी केली आहे. एक विद्यार्थी एका वेळी विविध कॉलेजांमध्ये तीन ते चार अभ्यासक्रमांना अर्ज करू शकतो. याच अर्जांच्या संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१मध्ये तीन लाख विद्यार्थ्यांनी सहा लाख ५० हजार अर्ज केले होते. यंदा तीन लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी पाच लाख ३० हजार अर्ज केले आहेत. याबाबत उच्च शिक्षणतज्ज्ञ सुधीर पानसे म्हणाले, 'सध्या समाजात मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता पाहावयास मिळत आहे. सरकार, पालक, विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य सर्वांमध्येच मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आहे. या अनश्चिततेचे हे दृश्यरूप आहे.' करोनाकाळात अनेकांचे आर्थिक समीकरण बिघडले आहे. यामुळे अनेक जण उच्च शिक्षणासाठी किती पैसे खर्च करायचे, या विवंचनेत आहेत. यामुळेच अर्जसंख्या कमी झाल्याचेही पानसे यांनी नमूद केले. यंदा बहुतांश विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांच्या वर गुण मिळाल्याने आपल्याला कोणत्याही कॉलेजात प्रवेश मिळेल, या विश्वासाने त्यांनी ठरावीक कॉलेजांमध्येच अर्ज केले असतील. त्यामुळे अर्जांची संख्या कमी असू शकते, असे मत करिअर मार्गदर्शक आनंद मापुस्कर यांनी व्यक्त केले. शिवाय विद्यापीठाची अर्ज भरण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी अद्याप अर्जच पूर्ण केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत साठ्ये कॉलेजचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे म्हणाले, 'विद्यार्थी आर्थिक अडचणीत असतील, तर त्यांना दिलासा म्हणून राज्य सरकारने शुल्ककपातीचा निर्णय घेतला आहे. ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ती पोहोचल्यावर निश्चितच विद्यार्थी प्रवेश घेतील, असा विश्वास वाटतो.' 'वॉक इन' प्रवेश विद्यापीठात 'नॅक'चा 'अ' दर्जा असलेली अनेक नामांकित कॉलेजे आहेत. यांमध्ये प्रवेशासाठी चांगलीच चढाओढ पाहावयास मिळाली. मात्र याउलट ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील कटऑफ यंदा कमालीचा घसरल्याचे समोर आले आहे. परिणामी काही कॉलेजांमध्ये तर 'वॉक इन' प्रवेश दिले जात आहेत. यामुळे त्यांनी पहिल्या यादीचे कटऑफच जाहीर केले नसल्याचे सांगण्यात येते. अर्ज भरण्यास मुदतवाढ पदवी प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व नोंदणी करणे बंधनकाकरक असते. ज्यांनी अद्याप ती केलेली नाही, त्यांना आणखी एक संधी मिळावी या उद्देशाने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १० सप्टेंबर, सायंकाळी ६ पर्यंत https://ift.tt/2Q6CO7k या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. प्रवेशअर्जांचा तुलनात्मक तपशील शैक्षणिक वर्ष विद्यार्थी नोंदणी अर्ज संख्या २०१५-१६ २,१८,००० ६,३०,००० २०१६-१७ २,७०,००० ८,५०,००० २०१७-१८ ३,००,००० ९,९०,००० २०१८-१९ २,८०,००० ८,६०,००० २०१९-२० २,६०,००० ७,८०,००० २०२०-२१ ३,००,००० ६,५०,००० २०२१-२२ ३,३५,००० ५,३०,०००
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mhrva4
via nmkadda