Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक () अद्याप जाहीर झालेले नाही. यात विविध अभ्यासक्रमांना मान्यता देणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील शिखर संस्थांनी सर्व राज्यांसाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक दिले आहे. आता परीक्षा जाहीर झाल्या तरी हे वेळापत्रक पाळणे अवघड होणार आहे. इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी याबरोबरच लॉ, बीएड, हॉटेल मॅनेजमेंन्ट, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. सीईटी गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात. या अभ्यासक्रमांच्या राज्यभरात असलेल्या विविध संस्थातील सुमारे चार लाख जागांवरील प्रवेश हे प्रवेश पूर्व परीक्षांच्या गुणांवरच दिले जातात. यंदा या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांना स्पष्टता दिलेली नाही. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांना मान्यता देणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने इंजिनीअरिंग प्रवेशाची ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. याचबरोबर सर्व प्रवेश प्रक्रिया २५ ऑक्टोबरपूर्वी संपवावी असेही सांगितले आहे. मात्र राज्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षाच अद्याप झालेली नाही. तसेच याचे वेळापत्रकही जाहीर झालेले नाही. आता वेळापत्रक जाहीर झाले तरी परीक्षेची तारीख किमान १५ दिवसांनंतरची असेल. ही परीक्षा झाल्यानंतर किमान १५ दिवसांनी निकाल जाहीर होणार त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे परिषदेने दिलेली पहिल्या प्रवेश फेरीच्या तारखेचे बंधन पाळणे राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षाला शक्य होणार नाही. याचबरोबर कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरनेही १ ऑक्टोबरपासून वर्ग सुरू करण्याबाबत सूचना केली आहे. याचप्रमाणे इतर अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांनीही अशा प्रकारची वेगवेगळी मुदत दिली आहे. या मुदतींमध्ये प्रवेश परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे सद्यस्थितीत अवघड दिसत आहे. यामुळे प्रवेश परीक्षा कक्षाने जर वेळेत वेळापत्रक जाहीर केले नाही तर भविष्यातील सर्वच वेळापत्रक कोलमडणार आहे. -सरकारकडून दखल नाही एमबीए प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनीही त्यांची प्रवेश परीक्षा लवकर घ्यावी यासाठी समाज माध्यमावरून आंदोलन सुरू केले होते. मात्र राज्य सरकारने याची दखलही घेतली नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या १५ विविध सीईटीसाठी तब्बल ७ लाख ७४ हजार ८५९ राज्यभरातून तसेच, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WuAvhg
via nmkadda