Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाच्या पार्श्वभूमीवर उच्चशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी झगडावे लागत असतानाच, डिप्लोमा, 'आयटीआय'चे शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या तुलनेत डिप्लोमा, 'आयटीआय'चे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या बाबतीत कमी फटका बसला आहे. करोनामुळे अनेक कुशल कर्मचारी आणि कामगारांनी स्थलांतर केल्याने, उत्पादन क्षेत्रात त्यांना नोकऱ्या मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले. करोनामुळे कॉलेज आणि विद्यापीठे मार्च २०२० पासून बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प आणि इंटर्नशिप करण्यात अडचणी आल्या. वर्कशॉप आणि प्रयोगशाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना 'प्रॅक्टीकल नॉलेज' मिळाले नाही. या कारणांमुळे २०२०-२१ या शैक्षणित वर्षात इंजिनीअरिंग (पदवी), फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए अशा अभ्यासक्रमांचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटमध्ये अडचणी येत आहेत. या विद्यार्थ्यांकडे इंडस्ट्रीला लागणाऱ्या कौशल्यांची कमतरता असल्याने त्यांचे प्लेसमेंट होत नसल्याचे चित्र आहे. मात्र, त्याचवेळी डिप्लोमा, 'आयटीआय'चे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या बाबतीत कमी फटका बसला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. डिप्लोमा आणि 'आयटीआय' अभ्यासक्रमाचा निम्म्यापेक्षा अधिक भाग प्रात्यक्षिक, इंडस्ट्रीअल ट्रेनिंग, वर्कशॉप ट्रेनिंग यांवर आधारित असतो. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासून प्रकल्प करावे लागतात. याचाच फायदा विद्यार्थ्यांना होतो. गेल्या शैक्षणिक वर्षात काही कालावधीसाठी 'आयटीआय' सुरू झाल्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला. त्यातच करोनामुळे परराज्यातील अनेक कर्मचारी, कामगार, फ्लोअर सुप्रिटेडन्ट त्यांच्या राज्यात परतले. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांमध्ये कुशल कामगारांची पोकळी निर्माण झाली. याचाच फायदा गेल्या शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षाला असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना झाला. या विद्यार्थ्यांना लघु आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांमध्ये नोकरी मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले. उत्पादन क्षेत्रातील ठरावीक नामांकीत कंपन्या दर वर्षी डिप्लोमाच्या अनेक विद्यार्थ्यांना इंटर्नशिप; तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतात. या संधींद्वारे विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या प्राप्त झाल्या, तर 'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांनादेखील त्यांच्या 'फिल्डवर्क'मुळे कंपन्यांमध्ये रोजगार मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले. करोनामुळे अनेक लहान व मध्यम स्वरूपाच्या कंपन्यांमध्ये कुशल कामगारांची कमतरता निर्माण झाली. ही पोकळी भरून काढण्यास 'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांनी हातभार लावला. त्यामुळे करोना काळातही विद्यार्थ्यांना त्यांच्या ट्रेडनुसार संधी मिळाली आहे. - योगेश पाटील, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (डीव्हीईटी) राज्यातील पॉलिटेक्निक कॉलेजची माहिती घेतल्यावर करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्लेसमेंटबाबत फारसा फटका बसला नाही. आयटी, कम्प्युटर, मेकॅनिकल शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून डिप्लोमा करणाऱ्यांना त्या तुलनेत कमी संधी मिळाल्या. - डॉ. एम. आर. चितलांगे, सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई)
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gF7BSJ
via nmkadda