Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई विद्यापीठांतर्गत कॉलेजांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी आज, सोमवारी जाहीर होणार आहे. मात्र दुसऱ्या यादीतच नॅकचा 'अ' दर्जा असलेल्या कॉलेजांच्या जागा भरल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची यापूर्वीच निराशा झाली आहे. तरीही तिसऱ्या गुणवत्ता यादीपूर्वी काही विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आणि त्यामुळे जर काही जागा रिक्त झाल्या तर प्रवेश मिळू शकेल या आशेवर हजारो विद्यार्थी प्रतीक्षा करित आहेत. यंदा बारावीच्या निकालात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे प्रथम वर्ष पदवीच्या प्रवेशात अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली आहे. यामुळे तिसऱ्या गुणवत्ता यादीची अपेक्षा अशा विद्यार्थ्यांना आहे. दुसऱ्या यादीनंतर अनेक नामांकित कॉलेजांमधील जागा पूर्ण भरल्या आहेत. त्यामुळे अनेक कॉलेजांमधील विनाअनुदानित तुकड्यांसाठी तिसरी यादी जाहीर होणार नसल्याचे समजते. तर दुसऱ्या यादीतही काही कॉलेजांमध्ये कला शाखेत जागा शिल्लक नसल्याने गुणवत्ता यादी जाहीर न झाल्याचे समोर आले आहे. यामुळे सोमवारी जाहीर होणाऱ्या गुणवत्ता यादीमध्ये इतर कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवताना विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेचे वातावरण पाहावयास मिळणार आहे. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना काही कारणास्तव प्रवेश रद्द केल्यास, वा तो न घेतल्यास अगदी काही मोजक्या जागांसाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे कॉलेज मिळाले नसेल, अशा विद्यार्थ्यांनी सध्या जेथे प्रवेश मिळाला तेथे प्रवेश घेऊन ठेवावा. यानंतर तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला जागणकारांनी दिला होता. अनेक विद्यार्थ्यांनी इनहाऊस कोट्यातून प्रवेश निश्चित केल्याने बाहेरील विद्यार्थ्यांसाठी जागा खूप कमी होत्या. मंगळवारी जाहीर झालेल्या यादीत बहुतांश कॉलेजांच्या जागा भरल्या असून शक्यतो तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार नसल्याचे एका कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितले. याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता इतर अभ्यासक्रमांची तिसरी यादी निश्चितपणे लागणार आहे, असा दिलासाही या प्राचार्यांनी दिला. त्यातच यंदा इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षा पार पडलेल्या नाहीत. यामुळे इंजिनीअरिंग तसेच वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी पारंपरिक बीएसस्सीसाठी प्रवेश घेतला आहे. जेव्हा इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्राची प्रवेश प्रक्रिया पार पडेल त्यावेळस या जागा रिक्त होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजांत प्रवेश मिळालेला नाही, त्यांनी निराश न होता काही काळ प्रतीक्षा करावी. इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी कॉलेज बदलू शकतात, असा सल्लाही प्राचार्यांनी या विद्यार्थ्यांना दिला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WC1SG3
via nmkadda