Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले ाने संलग्न महाविद्यालयांच्या शुल्कात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी कपात केली आहे. विद्यापीठे, महाविद्यालये बंद असल्याने वापरण्यात न आलेल्या विविध शैक्षणिक सुविधांच्या शुल्कात २५ ते १०० टक्के शुल्क कपात लागू केली आहे. या निर्णयामुळे पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या साधारण सात लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. करोनामुळे पालकत्व गमावलेल्या पाल्यांचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठे आणि महाविद्यालये साधारण दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे विद्यापीठे आणि महाविद्यालयांत ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. यंदाच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात पारंपरिक शिक्षणासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालये कधी सुरू होतील, याबाबत अद्याप कोणताच निर्णय नाही. त्यामुळे विद्यापीठे आणि महाविद्यालयांत कम्प्युटर कक्ष, ग्रंथालय, जिमखाना, प्रयोगशाळा अशा न वापरलेल्या सुविधांचे शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून करण्यात सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुल्ककपात करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाने परिपत्रक प्रसिद्ध करून विद्यापीठांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यानंतर, पुणे विद्यापीठाने सुधाकर जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीच्या अहवालाला व्यवस्थापन परिषदेत मान्यता मिळाल्यानंतर, शैक्षणिक विभागाकडून शुल्क कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग, संलग्न महाविद्यालये, संस्था यांना लागू राहणार आहे, तर विद्यापीठे आणि महाविद्यालयाचे प्रशासन आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना कमी झालेले शुल्क भरण्यासाठी हप्ते देऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना लेखी अर्ज द्यावा लागणार आहे, असे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थी उपस्थित झाल्यावर पूर्ण शुल्क भरावे लागणार राज्यात करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर, विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू होऊ शकतात. त्या वेळी विद्यार्थी शिक्षणासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालयांत उपस्थित राहू शकतात. अशा वेळी विद्यार्थ्यांना वापरल्या जाणाऱ्या सुविधांचे पू्र्ण शुल्क भरावे लागणार आहे, असेही परिपत्रकात सांगितले आहे. ऑनलाइन आणि मुद्रित नियतकालिकांसाठी शुल्क अनेक महाविद्यालये ऑनलाइन नियतकालिक प्रसिद्ध करतात. या महाविद्यालयांना २५ टक्के, तर मुद्रित नियतकालिक प्रसिद्ध करणाऱ्या महाविद्यालयांना ५० टक्के शुल्क घेण्याची मुभा आहे. कोणत्याही प्रकारचे नियतकालिक प्रसिद्ध न करणाऱ्या महाविद्यालयांना शुल्क घेता येणार नाही. महाविद्यालये ऑनलाइन उपक्रम राबवत असतील, तर त्यांना ५० टक्के शुल्क घेता येईल, तर उपक्रम न राबवणाऱ्या महाविद्यालयांना शुल्क आकारता येणार नाही. सुविधा - शुल्ककपात (कपात टक्क्यांमध्ये) औद्योगित संस्थांना भेटी - १०० कॉलेज मॅगझिन शुल्क - १०० सुरक्षा ठेव (डिपॉझिट) - १०० प्रयोगशाळा ठेव - १०० इतर ठेव - १०० आरोग्य तपासणी - १०० आपत्ती व्यवस्थापन - १०० अश्वमेध - १०० स्टुडंट वेल्फेअर - ७५ इतर शैक्षणिक उपक्रम - ५० ग्रंथालय - ५० प्रयोगशाळा - ५० जिमखाना - ५० कम्प्युटर कक्ष - ५० परीक्षा - २५ विकास शुल्क - २५ शुल्क कपातीच्या निर्णयाप्रमाणे महाविद्यालयांना नव्या शुल्काची नियामावली तयार करावी लागणार आहे. हे नवे शुल्क विद्यार्थ्यांना २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी भरावे लागणार आहे. - डॉ. एन. एस. उमराणी, प्र- कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मटा भूमिका शुल्ककपात फक्त कागदावरच नको करोनाच्या परिस्थितीमुळे शाळा-कॉलेज बंद असल्याने शुल्क कपात करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर कॉलेजांचे शुल्क कमी करण्याचा निर्णय झाला आहे. विद्यापीठ स्तरावर निर्णय होऊनही अनेकदा कॉलेज स्तरावर त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कॉलेज सुरू होत नाही, तोवर विद्यार्थ्यांना न पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचे शुल्क कमी होते का, याचा वेळोवेळी आढावा घेणे गरजेचे आहे. तसे झाले, तरच विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळेल; अन्यथा पुन्हा एकदा हा निर्णय निव्वळ कागदावरच राहण्याची भीती आहे. त्यामुळे विद्यापीठाने याबाबत ठोस भूमिका घेऊन कॉलेजांचे शुल्क कमी केले जाते ना, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j2SFj6
via nmkadda