Advertisement
आनंद मापुस्कर आंब्याचा मोसम नसताना अगदी ताजा वाटेल असा आमरस, मटारांचा मोसम नसतानाही उपलब्ध होणारा पिशवीबंद उत्तम मटार, नारळाचं दूध काढण्याच्या त्रासातून सुटका करून देणारं पॅकबंद नारळाचं दूध, अजिबात साफ करण्याची आवश्यकता नसलेले चिकन/ मटण...अशा अनेक पदार्थांनी आता स्वयंपाकघरात महत्त्वाचं स्थान मिळवलंय. आजच्या धावपळीच्या युगात स्वयंपाकासाठी मिळणारा वेळ कमी कमी होत असताना, अशा रेडी टू कूक, रेडी टू इट पदार्थांनी काम खरोखरच सुकर बनत आहे. अशात उपयुक्त अन्नपदार्थाची निर्मिती करणारं शास्त्र म्हणजे ! नाशिवंत अन्नपदार्थ टिकाऊ बनावेत या दृष्टीने त्यावर प्रक्रिया करणं. पण हे करताना अन्नपदार्थांमधली पोषणद्रव्यं, गुणवत्ता, रंग-रूप यांचंही जतन करणं ही तारेवरची कसरत कुशलतेने करणाऱ्या फूड टेक्नॉलॉजिस्टचं व्यवसाय क्षेत्र आज खूपच विस्तारलं आहे. शहरात होणाऱ्या नवनवीन मॉल्समुळे तयार बाजारपेठही निर्माण होत आहे. फक्त शहरातच नाही, तर ग्रामीण भागातही फूड टेक्नॉलॉजी हे महत्त्वाचं क्षेत्र आहे. शेतात तयार होणाऱ्या फळं, धान्य इत्यादींवर योग्य ती प्रक्रिया करून त्यांचं आर्थिक मूल्य वर्धित करणं हे फूड टेक्नॉलॉजीनेच शक्य आहे. उदाहरणार्थ, स्ट्रॉबेरी नुसतीच विकण्यापेक्षा थोडीशी साखर आणि प्रिझव्र्हेटिव्ह वापरून त्याचा जॅम, क्रश किंवा सिरप बनविल्यास तिचं आर्थिक मूल्य कितीतरी पटीने वाढतं. आपल्या शेतांमधल्या फळांवर, अन्नधान्यांवर प्रक्रिया करून असं मूल्य वाढविल्यास ग्रामीण आर्थिक व्यवस्थेवरही त्याचा निश्चितच चांगला परिणाम होईल. कृषिमालावर प्रक्रिया करणारा उद्योग हा भविष्यात वेगाने वाढणारा आणि जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणारा असेल, असे म्हटले जात आहे. त्यामागे ही सगळी पार्श्वभूमी आहे. साहजिकच फूड टेक्नॉलॉजी हा करिअरचा चांगला पर्याय ठरू पाहतो आहे. फूड टेक्नॉलॉजीचे स्वरूप : या फूड प्रोसेसिंग उद्योगामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान तसंच अभियांत्रिकी अशा अनेक विद्याशाखांचा समन्वय आवश्यक ठरतो. या उद्योगात उत्पादन व गुणवत्ता नियंत्रण (क्वालिटी कंट्रोल) असे दोन विभाग पडतात. उत्पादनाचं काम फूड टेक्नॉलॉजिस्ट करतात. अन्नावरील प्रक्रिया ठरवून दिल्याप्रमाणे होत आहे ना, याकडे त्यांना लक्ष द्यावे लागते. याशिवाय अन्नावरील प्रक्रिया करण्याच्या तसेच प्रिझव्र्हेशनच्या नवीन पद्धती शोधणे, प्रत्यक्ष प्रक्रिया करत असताना भेसळ होत नाही ना वा अन्नपदार्थ खराब होत नाही ना, हे पाहणे हेही त्यांना करावे लागते. फूड टेक्नॉलॉजिस्टना साखर, अल्कोहोल, बेकरी, डेअरी, तेल, फळं, भाजीपाला इत्यादी क्षेत्रात स्पेशलायझेशन करता येते. गुणवत्ता नियंत्रणाचे काम केमिस्ट किंवा फूड टेक्नॉलॉजिस्ट करतात. यात कच्च्या मालाचा दर्जा तपासणे, विक्रीसाठी तयार मालाच्या नमुन्यांची चाचणी घेणे, पॅकिंग तपासणे, कारखान्यात आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेणे इत्यादींचा समावेश होतो. या व्यवसायात ऑरगॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, अॅनालिटिकल केमिस्ट्री तसेच इंजिनीअरिंगच्या विविध शाखांतील तज्ज्ञांची गरज असते. फूड टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था तुलनेने कमी आहेत. बी.एस्सी. (फूड टेक्नॉलॉजी/ फूड सायन्स) किंवा बी.ई./ बी.टेक्. (फूड टेक्नॉलॉजी/ फूड सायन्स) आदी अभ्यासक्रमांसाठी १२ वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j53oJR
via nmkadda