Advertisement
अहमदनगर : राज्यातील शाळा सुरू करण्यासंबंधी राज्य सरकारमध्येच एकमत होत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यासंबंधी काढण्यात आलेला निर्णय कधी मागे घ्यावा लागला तर कधी स्थगित ठेवावा लागला. अशा परिस्थितीत एका सर्वेक्षणाचा दाखला देत शाळा लवकर सुरू व्हाव्यात, अशी मागणी करणारे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. शाळा वेळेत सुरू झाल्या नाहीत, तर शिक्षणातील गुंतागुंत वाढण्याचा धोका असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. करोनाच्या काळात शाळा बंद असल्याने सुमारे ७५ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या वय आणि इयत्तेनुसार आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य मिळाले नसल्याचे यामध्ये आढळून आले आहे. या सर्वेक्षणाचा दाखल देत पवार यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे, 'शिक्षक व पालकांची हरकत नसल्यास शाळा लवकर सुरू केल्या तर योग्य ठरेल. अन्यथा भविष्यात शिक्षणाबाबत गुंतागुंत निर्माण होऊन अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळं शाळा सुरू करण्याबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, ही विनंती. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड यासह आणखी काही राज्यांत ऑगस्टमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध असला तरी त्याचा किती उपयोग होतो आहे, याची पाहणी यामध्ये करण्यात आली आहे. त्यातून शिक्षणासंबंधीच्या अनेक अडचणी पुढे आल्या आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनीही आता शाळा प्रत्यक्षात सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.' याचा दाखला देत पवार यांनी हे ट्विट केलं आहे. आपल्याकडे सध्या शाळा सुरू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण हाती घेऊन तयारी सुरू झाली आहे. मात्र, तरीही शाळा केव्हा सुरू होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्यातही अनेक सर्वेक्षणांमधून पालकांनी शाळा सुरू व्हाव्यात अशीच मागणी केल्याचे यापूर्वीही आढळून आले आहे. मात्र, शाळा सुरू करण्यासाठी संबंधी सरकार तसेच या संबंधी नियुक्त करण्यात आलेला टास्क फोर्स यांच्यात मात्र अद्यपही एकमत होत नसल्याचे दिसून येते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nbwl9k
via nmkadda