Advertisement
ICSIL : नोकरीच्या शोधात असलेल्या लाखो तरुणांसाठी राज्यातून दिलासादायक बातमी आहे. करोना संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असताना दुसरीकडे १७ हजारहून अधिक नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्याची माहिती राज्य सरकारने जाहीर केली आहे. तसेच बेरोजगारांना दिलेल्या पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. करोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या,कॉर्पोरेट संस्था,उद्योग यांमध्ये ऑगस्ट२०२१ मध्ये१७ हजार३७२ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. २०२१ या वर्षात जानेवारी ते ऑगस्टअखेर १ लाख ११ हजार ८३ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आल्याचेही ते म्हणाले. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने महास्वयम हे वेबपोर्टल सुरु केले आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. यातील रोजगार विभागात जाऊन राज्यातील विविध रिक्त पदांचा तपशील कळू शकेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार येथे जाऊन अर्ज करु शकतात. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात असेही नवाब मलिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते असेही त्यांनी स्पष्ट केले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hy8NId
via nmkadda