Advertisement
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शिक्षक भरतीतील गैरप्रकार थांबविण्यासाठी शासनाने पवित्र पोर्टल आणले, परंतु त्यास संस्थाचालकांकडून तीव्र विरोध होत आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती बंद करा असे बुधवारी संस्था महामंडळाने सरकारला सुनावले. या बाबत पत्रकार परिषद घेत महामंडळाने शासनाच्या प्रशासकीय पातळीवरून या प्रक्रियेत घोटाळा होण्याची शक्यताही उद्भवू शकते असे म्हटले आहे. खासगी संस्थांमध्ये मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. याबाबत राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. खासगी शिक्षण संस्था या सेवाभावी संस्था असून त्यातील कर्मचारी भरतीचा अधिकार हा त्या-त्या संस्थेचा आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात पारदर्शक नोकरी भरती या गोंडस नावाखाली शिक्षकांची लेखी परीक्षा घेऊन त्यातील गुणांच्या आधारे थेट भरतीचा प्रस्ताव शासनाने तयार केलेला आहे. पोर्टलवरील परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांनी पवित्र पोर्टलचा फेरविचार व्हावा, अशी मागणी केली. या वेळी पत्रकार परिषदेला महामंडळाचे सरकार्यवाह एस. पी. जवळकर, विभागीय कार्यवाह वाल्मीक सुरसे आदींची उपस्थिती होती. राज्यातील शाळा दोन वर्षांपासून बंद आहेत. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. मुलांची मानसिकता बिघडत चालली. त्यामुळे तात्काळ शाळा सुरू कराव्यात अशी मागणी पाटील यांनी केली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tRJ6r4
via nmkadda