मुंबई विद्यापीठाच्या पालघर उपकेंद्राची अद्याप प्रतीक्षाच Rojgar News

मुंबई विद्यापीठाच्या पालघर उपकेंद्राची अद्याप प्रतीक्षाच Rojgar News

म. टा. वृत्तसेवा, पालघर पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यातील शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने पालघर येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र () प्रस्तावित आहे. परंतु या उपकेंद्रासाठी आवश्यक जमिनीच्या प्रस्तावाला करोनाच्या पार्श्वभूमीवर विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आणखी काही वर्षे कायम राहणार आहे. तोपर्यंत त्यांना शैक्षणिक कामासाठी मुंबईतच खेटे मारावे लागणार असल्याचे दिसत आहे. कोकणातील अन्य जिल्ह्यांसह पालघर जिल्ह्यातही मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यानंतर पालघरमध्ये उपकेंद्र उभारण्यासाठी तातडीने जमीन शोधण्याच्या व ती मिळविण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी, विविध अधिकारी यांच्याशी याबाबत प्रत्यक्ष चर्चा केली. या चर्चेनंतर पालघर तालुक्यातील पालघर नगरपरिषद क्षेत्रालगत असलेल्या माहीम गावच्या हद्दीतील १०० एकर जागा उपकेंद्रासाठी प्रस्तावित करण्यात आली. माहीम गावच्या गट क्रमांक ८३५मधील १०० एकर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोकण आयुक्त कार्यालयाला ऑगस्ट २०२०मध्ये पाठवण्यात आला. या प्रस्तावावर काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या. काही परवानग्या तसेच तांत्रिक त्रुटी यांची पूर्तता करण्यासाठी हा प्रस्ताव पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे डिसेंबर २०२०मध्ये आला. त्रुटी या पालघर तहसील कार्यालयाशी संबंधित असल्याने त्याबाबतची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने लागलीच तहसीलदारांना प्रस्ताव पाठवला, मात्र करोना संकट, कामांचा ताण तहसीलदारांवर असल्याने या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. तहसीलदारांमार्फत या त्रुटी दूर व परिपूर्ण चौकशी केल्यानंतर तहसीलदार उपकेंद्राच्या जमीन प्रस्तावाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव पुढे जिल्हाधिकारी यांच्या सहीने कोकण महसूल आयुक्त कार्यालयाकडे दिला जाणार आहे. कोकण आयुक्त कार्यालयाकडून हा प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर केल्यानंतर त्याला मंजुरी मिळेल. सरकार निर्णयाचे सर्व सोपस्कार पार पाडून अध्यादेशानुसार ही जमीन मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी दिली जाईल. या प्रक्रियेला बराच विलंब लागणार असल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या पालघर उपकेंद्राची प्रतीक्षा आणखी काही वर्षे कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. जमीन मिळाल्यावर आराखडा प्रस्तावित असलेली जमीन मुंबई विद्यापीठाला उपकेंद्रासाठी मिळाल्यानंतर अटी-शर्तींची पूर्तता करून या ठिकाणी उपकेंद्र उभारणीसाठी आराखडा तयार करेल. या आराखड्याअंतर्गत विविध सुविधांसह अनेक शैक्षणिक उपक्रम व पदवी-पदव्युत्तर कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा अभ्यासक्रमासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागणार नाही. पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या व सुविधेच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र पालघर जिल्ह्यात लवकरात लवकर सुरू होणे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. ते सुरू झाल्यास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आपल्या कामासाठी मुंबईला जाण्याचा त्रास वाचेल. दूरस्थ शिक्षण विभागाचे विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पालघर येथे सुरू होऊ शकतील. तसेच स्थानिक गरजा लक्षात घेऊन अनेक कौशल्याधारित अभ्यासक्रम विद्यापीठाला सुरू करता येतील. - डॉ. किरण सावे, प्राचार्य, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZlLHyd
via nmkadda

0 Response to "मुंबई विद्यापीठाच्या पालघर उपकेंद्राची अद्याप प्रतीक्षाच Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel