Advertisement

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील विविध विद्यापीठे, त्याअंतर्गत येणाऱ्या कॉलेजांमध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ ते २५ वर्षे वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने 'मिशन युवा स्वास्थ्य' या मोहिमेची सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी मुंबईतील ३२ कॉलेजांमध्ये पार पडलेल्या मोहिमेत तीन हजार ९२० विद्यार्थ्यांनी लस घेतली. मिशन युवा स्वास्थ्य लसीकरण मोहिमेअंतर्गत २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत कॉलेजांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. या कालावधीत ४० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली होती. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कॉलेज आणि स्थानिक आरोग्य केंद्र यांची सांगड घालून देण्यात आली आहे. प्रत्यक्ष कॉलेज सुरू करताना ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही लसमात्रा घेतल्या आहेत त्याच विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येता येणार आहे. यामुळे केवळ लस घेतली नाही म्हणून प्रत्यक्ष कॉलेजला येता आले नाही असे होऊ नये. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने लसीकरण महत्त्वाचे असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. यानुसार सोमवारी शहरातील एम. एम. के. कॉलेजमध्ये सामंत यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी ३२ कॉलेजांमध्ये ३,९२० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. सोनाली रोडे यांनी दिली. आज, मंगळवारीही शहरातील विविध कॉलेजांमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी एम. एम. के. कॉलेजमध्ये युवा सेना अधिसभा सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, युवा सेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Ei1oFG
via nmkadda