कॉलेज ऑफलाइन; विद्यार्थी मात्र ऑनलाइन Rojgar News

कॉलेज ऑफलाइन; विद्यार्थी मात्र ऑनलाइन Rojgar News

अभिषेक तेली मुंबई : तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कॉलेजची दारे विद्यार्थ्यांसाठी खुली झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला पाहायला मिळाला. अर्थात, कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र कमी होती. खुली झाली असली, तरी अनेक विद्यार्थ्यांनी घरुनच ऑनलाइन शिकण्याला पसंती दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. अद्याप न झालेले लसीकरण, ऑनलाइन सुरू असलेल्या प्रथम सत्राच्या परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती तुलनेने कमी होती. आपल्या लाडक्या कॉलेजमध्ये पुन्हा कधी जाता येईल याकडे विद्यार्थी डोळे लावून बसले होते. करोनाच्या नियमांमध्ये हळूहळू शिथिलता येत त्यांची ही प्रतीक्षा संपली. २० ऑक्टोबरला कॉलेजची दारे विद्यार्थ्यांसाठी खुली झाली. काहींना बऱ्याच काळानंतर तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच कॉलेजमध्ये पाऊल टाकता आले. बऱ्याच कॉलेजांनी प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांच्या स्वागताचे फलक लावले होते. प्रवेशद्वारावर तापमान तपासून, सॅनिटायझर देऊनच प्रवेश दिला जात होता. शिक्षक मंडळी चेहऱ्यावर मास्क लावूनच वर्गांमध्ये शिकवताना दिसत होती. विद्यार्थीही करोनाविषयक नियमांचे पालन करून, सुरक्षित अंतर ठेवून वर्गात बसले होते.काही ठिकाणी सकाळी सातच्या तासिकेला हजेरी लावण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क सकाळी साडेसहा वाजल्यापासून कॉलेजच्या बाहेर रांगा लावल्या होत्या. चेहऱ्यावर मास्क, तापमानाची तपासणी, निर्जंतुकीकरण करून घेत काळजी घेतली जात होती. वर्गांत अंतर ठेवून विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली होती. तिथे त्यांना कॉलेजबद्दल व होणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली. शिक्षक मास्क लावून शिकवत होते तर विद्यार्थीही नियमांचे पुरेपूर पालन करत मास्क लावूनच प्रत्यक्ष तासिकेला बसले होते. विज्ञान शाखेच्या प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष प्रयोगाचा अनुभव घेत होते. एकमेकांशी ओळख करून घेत नव्या मैत्रीचे धागे विणले जात होते. काही विद्यार्थी कॉलेजचे फोटो काढण्यात, जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत सेल्फी घेण्यात दंग झाले होते. तर अनेक कॉलेजांमध्ये ऑनलाइन पद्धतीने प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू असल्यामुळे त्यांनी दिवाळीनंतरच कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण नसल्याने.. संपूर्ण लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश हा मुख्य नियम असल्यामुळे अनेक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी कमी होती. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नसून काही विद्यार्थी वयोमर्यादेमुळे लसीकरणास पात्र ठरू शकत नाहीत. त्याचबरोबर प्रवासावरसुद्धा मर्यादा असल्याने बरेच विद्यार्थी कॉलेजपर्यंत पोहोचू शकले नाहीत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3B3xF1j
via nmkadda

0 Response to "कॉलेज ऑफलाइन; विद्यार्थी मात्र ऑनलाइन Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel