Advertisement

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षा आणि सरकारी विभागांच्या पदभरती परीक्षांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिकसोबतच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष साह्य विभागाकडून याबाबतच्या सविस्तर सूचनांचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रानुसार लक्षणीय-दिव्यांग व्यक्तींबाबत लेखी परीक्षा घेण्याबाबतची 'मार्गदर्शिका २०२१' प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार दिव्यांग परीक्षार्थीला स्पर्धा परीक्षेला प्रविष्ठ होताना लेखनाची अडचण येते; तसेच त्यांची लेखनाची गती कमी असल्यास, त्यांना समस्या येऊ शकते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांना लेखनिक, वाचक किंवा प्रयोगशाळा सहायक यांची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. या सुविधेसाठी दिव्यांग परीक्षार्थ्यांने सरकारी रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी परीक्षार्थ्याने संबंधित परीक्षा मंडळाकडे मागणी करायची असून, त्यानंतर मंडळाकडून लेखनिकांची यादी तयार करण्यात येईल. त्याचप्रमाणे परीक्षा मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या लेखनिकाची शैक्षणिक पात्रता ही परीक्षेसाठी असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असल्याबाबतची; तसेच सदर लेखनिकाची शौक्षणिक पात्रता इयत्ता दहावी किंवा त्यापेक्षा जास्त असल्याबाबतची खात्री करावी, अशा महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. युवासेनेकडून मदत करणार सामाजिक न्याय विभागाच्या विशेष सूचनांबाबत एमपीएससीने दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक व विशेष मदत देण्याबाबत सोशल मीडियावर माहिती प्रसिद्ध केली आहे. दिव्यांग विद्यार्थी अनेक आव्हाने पेलून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना कुठलीही अडचण येणार नाही, या उद्देशाने युवासेनेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे युवासेनेचे पदाधिकारी कल्पेश यादव यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uQlW4N
via nmkadda