TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

'न्यासा' कंपनीवर कोणाचा वरदहस्त? Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील गोंधळ परीक्षेच्या (Maharashtra Health Department Exam) दिवशीही कायम राहिल्याने परीक्षेचे नियोजन करणाऱ्या 'न्यासा' (,NCPL) या खासगी कंपनीवर कोणाचा वरदहस्त आहे, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील गोंधळ परीक्षेच्या दिवशीही कायम राहिला. विभागाच्या ‘क’ गटातील परीक्षा रविवारी झाल्या खऱ्या; मात्र परीक्षा केंद्रांचा गोंधळ, वेळेत न मिळालेल्या प्रश्नपत्रिका आणि परीक्षेचे ढिसाळ संचालन व केंद्र संचालकांनीच मारलेली दांडी यामुळे विद्यार्थ्यांच्या वाट्याला रविवारी मनस्तापाशिवाय दुसरे काहीच आले नाही. ही परीक्षा आयोजित करणाऱ्या ‘न्यासा’ या खासगी कंपनीने परीक्षेच्या दिवशीही आपल्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभाराचे दर्शन घडविल्याने या कंपनीवर कोणाचा वरदहस्त आहे, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. सकाळच्या सत्रासाठी परीक्षा केंद्रांवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या चुकीच्या केंद्र क्रमांकामुळे परीक्षा केंद्रच सापडत नव्हते. पुण्यातील ‘आझम कॅम्पस’, ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’, चिंचवड येथील ‘गीतामाता इंग्लिश मीडियम स्कूल’ अशा अनेक केंद्रांवर मोठा गोंधळ उडाला होता. हा गोंधळ सावरून परीक्षेला बसणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना जवळपास तासभर उशिराने प्रश्नपत्रिका मिळाली. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची कडक तपासणी करून, चप्पल, बूट काहीही न घालता परीक्षेला बसण्यास सांगितले होते, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना मोबाइल घेऊन जाण्यास परवानगी दिली. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळण्यास उशीर झाला, अशांमधील काही विद्यार्थ्यांना वेळ वाढवून मिळाली, तर काही विद्यार्थ्यांना एकच तास परीक्षा देऊ दिली. पुरेसा वेळ न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संतप्त होऊन परीक्षा केंद्रांबाहेर आंदोलन केले; पण त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी केंद्र संचालक गैरहजर असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत सातत्याने गोंधळ निर्माण करणाऱ्या 'न्यासा'ला हटवून परीक्षेचे संयोजन दुसऱ्या संस्थेकडे द्यायला हवे होते; मात्र सरकारने ऐकले नाही. प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशीही तोच गोंधळ दिसून आल्याने 'न्यासा'चे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा समोर आले. ही कंपनी परीक्षेच्या संयोजनामध्ये सातत्याने अपयशी ठरत असतानाही ती कायम कशी राहते, सरकारमधील कोणत्या मंत्र्याचे या कंपनीवर प्रेम आहे का, असा संतप्त सवाल विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. परीक्षेमध्ये झालेले घोळ १. विद्यार्थ्यांना सुमारे एक तास प्रश्नपत्रिका उशीरा मिळाली. २. उशीरा परीक्षा सुरू होऊनही काही ठिकाणी वेळेतच संपवण्यात आली. ३. परीक्षेला पर्यवेक्षक म्हणून बारावी, प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते. ४. केंद्र क्रमांक चुकविल्याने परीक्षेच्या आधी केंद्र शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागली. ५. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी केंद्र संचालक उपस्थित नव्हते. ६. काही ठिकाणी विद्यार्थ्यांची कडक तपासणी, तर काही ठिकाणी परीक्षेसाठी मोबाइल वापरण्याची परवानगी. ‘आझम कॅम्पस’ या केंद्रावर परीक्षेसंदर्भात काही त्रुटी आढळून आल्या. परीक्षा घेण्याची पूर्ण जबाबदारी ‘न्यासा’ या कंपनीवर देण्यात आली होती. या सर्व त्रुटी त्यांच्या आणि आरोग्य विभागाच्या दृष्टीस आणून दिल्या आहेत. आता पुढील कार्यवाही आरोग्य विभागाचे वरीष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांकडून केली जाईल. विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणींचा आढावा घेण्यात आल्या असून, सर्व गोष्टी वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. - डॉ. अभिजीत फडणीस, नोडल अधिकारी , आरोग्य विभाग परीक्षा 'अभाविप', भाजपचे आंदोलन आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या गोंधळाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि भारतीय जनता पक्षाने आंदोलन करून आरोग्य विभाग आणि सरकारचा निषेध केला. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी 'आझम कॅम्पस' येथे आंदोलन केले, तर 'अभाविप'नेही याच परिसरात आंदोलन करून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. 'अभाविप'कडून प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. राज्य सरकारला काहीच कसे वाटत नाही? लातूरसारख्या भागांतून आम्ही परीक्षेसाठी आलो आणि येताच सकाळी मनस्तापाला सामोरे जावे लागले. विद्यार्थ्यांना तासभर उशिराने प्रश्नपत्रिका मिळाली. त्यानंतर काही जणांनाच कालावधी वाढवून देण्यात आला. ही बाब अत्यंत संतापजनक असून राज्य सरकारला काहीच कसे वाटत नाही? - रामराव चव्हाण, विद्यार्थी, लातूर


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EdAoXX
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या