Advertisement

उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी विभागाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहेत. खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी १८ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली असून, १ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. अर्ज पडताळणी आणि स्वीकृती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना १ नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग, पुणे यांच्या कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्वभूमीवर २०१८ पासून उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होत असून, आता मुदतवाढ मिळाल्याने आणखी काही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DX7fA7
via nmkadda