कॉलेजांसाठी मुंबई विद्यापीठाची नियमावली जाहीर Rojgar News

कॉलेजांसाठी मुंबई विद्यापीठाची नियमावली जाहीर Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने २० ऑक्टोबरपासून कॉलेजे सुरू करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने संलग्न कॉलेजांना वर्ग सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. कॉलेजे सुरू करताना स्थानिक प्रशासनाशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी सूचना मुंबई विद्यापीठाने प्रमाणित कार्यप्रणालीद्वारे (एसओपी) कॉलेज प्रशासनांस केली आहे. राज्यातील ग्रामीण भागांतील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागांत इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहेत. कॉलेजचे विद्यार्थी हे १८ वर्षांवरील असून बहुतांश विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले असण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित कॉलेजांमध्ये कोव्हिड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करून विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन पद्धतीने नियमित वर्ग सुरू करणे त्यांच्या हिताचे असेल. त्यामुळे कॉलेजे २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार मुंबई विद्यापीठाने संलग्नित कॉलेजांचे प्राचार्य व मान्यताप्राप्त परिसंस्थांचे संचालक यांना करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नियमित वर्ग सुरू करण्यासंदर्भात परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. कॉलेजांचे वर्ग सुरू करताना ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने सुरू करताना करोनाच्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती, प्रतिबंधित प्रक्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषय पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेण्यात याव्यात. तसेच कॉलेजे सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करून कॉलेजांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, आदी सूचना विद्यापीठाने परिपत्रकामध्ये दिल्या आहेत. १८ वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांनी लशींचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना कॉलेजात प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल, अशी सूचना राज्य सरकारने दिली आहे. या सूचनांचे तंतोतंत पालन करत ज्या विद्यार्थ्यांनी करोनाची लस घेतलेली नाही त्यांच्यासाठी कॉलेजांनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम घ्यावी, तसेच कॉलेजातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचेही प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, अशा सूचनाही मुंबई विद्यापीठाने कॉलेजांना केल्या आहेत. अन्य महत्त्वाच्या सूचना - कॉलेज सुरू असलेल्या कालावधीत पूर्णवेळ वैद्यकीय कक्ष कार्यरत असणे आवश्यक. - कोणी आजारी वाटत असल्यास त्यांना तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार उपलब्ध करून देणे. - एखादा रुग्ण आढळल्यास तर तो ज्या भागात गेला त्याचे निर्जंतुकीकरण करून पुढील काम सुरू करावे. - पूर्णवेळ मास्कचा वापर. - प्रत्येकाच्या मोबाइलवर आरोग्य सेतू अॅप असणे गरजेचे. - लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण न झालेल्यांना संकुलात प्रवेशबंदी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jcnlOq
via nmkadda

0 Response to "कॉलेजांसाठी मुंबई विद्यापीठाची नियमावली जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel