Advertisement

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : तब्बल दीड वर्षांनी येत्या सोमवारपासून प्रत्यक्ष शाळा सुरू होत आहेत. यासाठी अनेक शाळांनी शनिवारी पालकसभांचे आयोजन केले होते. यामध्ये शाळांनी गणवेशसक्ती केली आहे, तर काही शाळांनी सकाळी ऑनलाइन वर्ग आणि दुपारी त्याच विद्यार्थ्यांचे ऑफलाइन वर्गाचे आयोजन केल्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आहे. दीड वर्षांनंतर मुंबई शहरातील शाळा प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. शाळांचे नियम नेमके कसे असतील? यासाठी काय करावे लागेल? याबाबत शनिवारी शहरातील बहुतांश शाळांनी ऑनलाइन पालकसभेचे आयोजन केले होते. यामध्ये पालक आणि मुख्याध्यापक यांच्यात वाद झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. काही शाळांनी गणवेश सक्ती केली आहे. मात्र, दीड वर्षे प्रत्यक्ष शाळा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांकडे सध्या त्यांना परिधान करता येतील, असे गणवेश उपलब्ध नाहीत. तर काही शाळा अवघ्या सात ते आठ दिवस प्रत्यक्ष भरणार असून, ऑनलाइन परीक्षांचे आयोजन केले आहे. याचबरोबर भविष्यात शाळा किती काळ सुरू राहतील याबाबतही स्पष्टता नाही. यामुळे विशेषत: दहावीच्या पालकांनी गणवेश सक्ती नको, अशी विनंती केली. अन्यथा या पालकांना आता गणवेशाचा खर्च करावा लागेल. मात्र, शाळांनी ती ऐकली नसून एक आठवड्याची मुदत दिली आहे. तर काही शाळांनी सकाळाचे मधल्या सुटीपर्यंतचे सत्र ऑनलाइन आयोजित केले आहे. यानंतर विद्यार्थी घरीच न्याहारी करून नंतरच्या सत्रात प्रत्यक्ष शाळेत जाऊन उपस्थिती लावावी, अशी सूचना केली आहे. यालाही अनेक पालकांनी विरोध केला आहे. काही शाळांनी ५ तारखेपासून थेट परीक्षांचे आयोजन केले आहे. या परीक्षा नंतर घेण्यात याव्यात यावरूनही वाद झाल्याचे पालकांनी सांगितले. तयारीला मिळालेला अपुरा वेळ आणि पालकांचे संमतीपत्र मिळत नसल्याने अनेक शाळांनी प्रत्यक्ष शाळा दिवाळीनंतरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वाहतुकिचा पर्याय हवा शासन निर्णयानुसार सार्वजनिक वाहतुकीचा वापर न करता विद्यार्थ्यांना शाळेत पोहचायचे आहे. मात्र, मुंबईत ते शक्य होणे अवघड आहे. यामुळे मुंबईसाठी तरी या अटीला बगल द्यावी, अशी मागणी पालक करत आहेत. ज्युनिअर कॉलेजांमध्ये अनेक विद्यार्थी लांबच्या शहरातून लोकलने प्रवास करून येतात. त्यांना चालत पोहचणे कसे शक्य होणार, असा प्रश्नही पालक विचारत आहेत. अशीही सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने शिक्षण देण्याच्या सूचना आहेत. यामुळे काही शाळांनी ऑफलाइन वर्गाचे थेट लाइव्ह प्रक्षेपण व्हिडीओ स्ट्रिमिंग अॅपद्वारे घरातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना एक दिवसाआड उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l6yj9H
via nmkadda