रोहिणी शहा
राज्यसेवा पूर्व परीक्षा एप्रिलमध्ये प्रस्तावित आहे. मागील लेखांमध्ये पूर्व परीक्षेच्या इतिहास घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखापासून भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील भूगोल घटकाच्या प्रश्नांचे विश्लेषण या लेखामध्ये पाहू. मागील तीन वर्षांतील प्रातिनिधिक प्रश्न पाहणे यासाठी उपयुक्त ठरेल. योग्य उत्तराचा पर्याय ठळक केलेला आहे.
प्रश्न १. पुढील विधाने विचारात घ्या.
(a) कडप्पा खडक श्रेणी ही पेनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आढळते.
(b) धारवाड खडक श्रेणीमधे लोहखनिज, मँगनिज सापडते.
(c) गोंडवना खडक श्रेणीमधे दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो.
पर्यायी उत्तरे:
१) फक्त विधान (a) बरोबर आहे. २) फक्त विधान (b) बरोबर आहे.
३) विधान (b) आणि (c) बरोबर आहेत. ४) विधान (a), (b) आणि (c) बरोबर आहेत.
प्रश्न २. खालील विधानांचे परीक्षण करा व योग्य पर्यायाची निवड करा.
विधान अ: पृथ्वीचा अंतर्गाभा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनला आहे.
विधान ब: पृथ्वीचे कवच हे सिलिका, अॅल्युमिनिअम आणि मॅग्नेशिअम यांच्यापासून बनले आहे.
पर्यायी उत्तरे:
१) विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. २) विधान अ बरोबर असून ब चूक आहे.
३) विधान अ चूक असून ब बरोबर आहे. ४) विधान अ आणि ब दोन्ही चूक आहेत.
प्रश्न ३. खालील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायांची निवड करा.
अ. ज्या ठिकाणी खंडांत उतार अतिशय रुंद असतो, त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्रे तयार होतात.
ब. उबदार उष्ण कटीबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे.
क. उष्ण आणि थंड समुद्री प्रवाहांच्या मिश्रणामधून माश्यांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते.
ड. भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा खूप महत्त्वाची आहे.
पर्यायी उत्तरे:
१) विधाने अ आणि ब सत्य आहेत.
२) विधाने अ आणि क सत्य आहेत.
३) विधाने ब, क आणि ड सत्य आहेत.
४) विधाने अ, ब आणि क सत्य आहेत.
प्रश्न ४. खालील शास्त्रज्ञांनी दिलेल्या ‘इष्टतम लोकसंख्येच्या व्याख्येशी संदर्भित शास्त्रज्ञांच्या जोडय़ा लावा.
(a) बॉडिंग (i) जास्तीत जास्त आर्थिक परतावा
(b) डॅल्टन (ii) राहणीमानाचा दर्जा उंचावणे
(c) पीटरसन (iii) जास्तीत जास्त समाज कल्याण
(d) कार सॉन्डर्स (iv) दरडोई जास्तीत जास्त उत्पन्न
पर्यायी उत्तरे:
१) (a)- (iv) (b)- (iii) (c)- (ii) (d)- (i)
२) (a)- (ii) (b)- (iv) (c)- (i) (d)-(iii)
३) (a)- (ii) (b)- (iii) (c)- (iv) (d)- (i)
४) (a)- (iii) (b)- (i) (c)- (iv) (d)- (ii)
प्रश्न ५. खालील वैशिष्टय़े कोणत्या प्रदेशाची आहेत?
अ. जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे.
ब. नारळाचे उत्पादन घेतले जाते.
क. मासेमारीसाठी अनुकूल असतो.
ड. पर्यटकांसाठी आकर्षक असतो.
पर्यायी उत्तरे:
१) उत्तर भारतीय मैदानी प्रदेश २) प्रायद्वीपीय पठारी प्रदेश
३) किनारवर्ती प्रदेश ४) हिमालयीन प्रदेश
प्रश्न ६. खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) हे विधान असून (र) हे कारण आहे. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
विधान (अ) पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वासाठी उपयुक्त साधन आहे.
कारण (र): पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वेमार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चीक आहे.
पर्यायी उत्तरे:
१) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
२) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
३) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
४) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
या प्रातिनिधिक प्रश्नांवरून तयारी करताना विचारात घ्यायचे पुढील मुद्दे लक्षात येतात.
- सरळसोट एका शब्दा / वाक्याचा पर्याय असलेल्या प्रश्नांचे प्रमाण नगण्य आहे.
- बहुविधानी प्रश्नांमध्येही योग्य-अयोग्य पर्याय शोधणे अशा ठरावीक स्वरूपाबरोबरच कथन – कारण शोधणे, निष्कर्ष शोधणे असेही प्रश्न विचारलेले दिसून येतात. यामध्ये जोडय़ा लावणे प्रकारच्या प्रश्नांवर आयोग बहुतांश वेळ भर देताना आढळतो.
- भूगोलाच्या शाखा, सिद्धांत व ते मांडणारे शास्त्रज्ञ, महत्त्वाची प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक या बाबींवर किमान एक प्रश्न विचारण्यात आला आहे. नकाशावर किंवा आकृत्यांवर आधारित किमान एका प्रश्नाचा समावेश करण्यात आला आहे. लोकसंख्या भूगोलावरही किमान एक प्रश्न विचारलेला दिसतो.
- उर्वरित अभ्यासक्रमावरील घटकांवरील प्रश्नांची संख्या दरवर्षी बदलताना दिसत असली तरी मागील प्रश्न पत्रिकांच्या विश्लेषणावरून एखाद्या वर्षी कोणता घटक जास्त किंवा कमी महत्त्वाचा असेल याचा अंदाज घेणे कठीण नाही.
- तरीही भूरूपे, जागतिक हवामान, महाराष्ट्रातील व देशातील महत्त्वाची शहरे, भारताचा व महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हे भाग नेहमीच कटढ यादीत असले पाहिजेत.
- बहुविधानी प्रश्न सोडविण्यास नकाशा समोर ठेवून केलेल्या अभ्यासातून मदत होते. तसेच वारंवार आकृत्या / चित्र पाहत उजळणी केल्यास भूरूपे या घटाकावरील कोणत्याही प्रकारचे प्रश्न आत्मविश्वासाने सोडविता येतात.
- बहुविधानी प्रश्नांचे स्वरूप पाहता मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजल्या असतील तर ते आत्मविश्वासाने सोडविता येतात हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास हा आधी मूलभूत संकल्पना समजून घेणे व त्यानंतर नकाशावर आधारित अभ्यास व शेवटी तथ्यात्मक अभ्यास अशा क्रमाने करणे फायदेशीर ठरते.
The post एमपीएससी मंत्र : राज्यसेवा पूर्व परीक्षा भूगोल प्रश्न विश्लेषण appeared first on Loksatta.
from करिअर वृत्तान्त – Loksatta https://ift.tt/32L7Yan
Source https://ift.tt/3dmx3ZV
0 टिप्पण्या