TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

एमपीएससी मंत्र : संकल्पनात्मक आणि प्राकृतिक भूगोल

फारुक नाईकवाडे

भूगोल विषयाचे भौतिक, सामाजिक व आर्थिक असे ठळक तीन उपविभाग पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात आयोगाने ठरवले आहेत. या अभ्यासक्रमामध्ये जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल अशी या घटकाची व्याप्ती विहित केलेली आहे. अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या दोन विषयांच्या अभ्यासामध्ये भूगोलाच्या मूलभूत संकल्पना माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे पूर्व व मुख्य दोन्ही परीक्षांच्या तयारीसाठी भौगोलिक संज्ञा, संकल्पना पक्क्या करून घेणे महत्त्वाचे आहे. मागील लेखामध्ये या घटकावरील पूर्वपरीक्षेतील प्रश्नांचे विश्लेषण आणि त्याआधारे तयारी करताना लक्षात घ्यायचे मुद्दे याबाबत चर्चा करण्यात आली आहे. या विश्लेषणाच्या आधारे प्रत्यक्ष तयारीचे नियोजन कसे असावे ते या लेखात पाहू.

महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात भूगोलाचा दोन प्रकारे अभ्यास करावा लागणार आहे. एक भाग पूर्णपणे महाराष्ट्राच्या भूगोलाचा आहे आणि दुसरा भाग भारताच्या भूगोलातील एकक म्हणून महाराष्ट्राच्या अभ्यासाचा आहे. पहिल्या भागामध्ये महाराष्ट्राच्या आदिम जमाती, खनिज संपत्ती, भौगोलिक विभाग, आर्थिक भूगोल, लोकसंख्येचे पैलू, कृषी हवामान विभाग, नदीप्रणाली इ.चा अभ्यास ठेवायचा आहे. दुसऱ्या भागामध्ये भौगोलिक, प्राकृतिक, आर्थिक, लोकसंख्या इ. बाबींचा संपूर्ण भारतातील या वैशिष्टय़ांशी संबंधित एक घटक म्हणून आणि इतर घटकांशी तुलना करून विश्लेषणात्मक असा अभ्यास अपेक्षित आहे.

भूगोलाच्या पायाभूत महत्त्वाच्या संकल्पना वैज्ञानिक आहेत आणि त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करायला हवा. सगळ्यात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजावून घ्यायला हव्यात. यानंतर निरनिराळया भौगोलिक प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाण वेळ इ. पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. पृथ्वीचे वजन, वस्तुमान, ढगांचे प्रकार इ. बाबी सोडता येतील. जगातील भूरूपांपैकी केवळ प्रसिद्ध नद्या, पर्वत, सरोवरे इ.चा अभ्यासही पुरेसा ठरेल. जगातील हवामान विभाग व त्यांची थोडक्यात वैशिष्टय़े समजून घ्यावीत. जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हवामान विभागांना असलेली वेगवेगळी नावे तसेच वादळे, विशिष्ट भूरूपे, वाऱ्याचे प्रकार यांच्यासाठी असलेली वेगवेगळी नावे यांच्या कोष्टकामध्ये नोट्स काढता येतील. भारतामध्ये असणारे हवामान विभाग व त्यांची वैशिष्टय़े समजून घ्यावीत.

मान्सूनची निर्मिती, वितरण, भारताच्या/ महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व,  ऋतूंची निर्मिती, मृदानिर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. महत्त्वाच्या भौगोलिक प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही भौगोलिक घटना/ प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत-

भौगोलिक व वातावरणीय पाश्र्वभूमी; घटना घडू शकते/घडते ती भौगोलिक ठिकाणे; प्रत्यक्ष घटना/प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे/प्रक्रियेचे परिणाम; पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिक महत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया (current events) नैसर्गिक आपत्ती, चक्रीवादळांची नावे यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

भूरूपनिर्मितीचा वारा, नदी, हिमनदी व समुद्र या चार कारकांच्या शीर्षकाखाली मुद्यांच्या वा कोष्टकाच्या स्वरूपात नोट्स काढता येतील. यामध्ये प्रत्येक कारकासाठी खनन/अपक्षरण आणि संचयन कार्यामुळे होणारी भूरूपे, त्यांचे आकार, वैशिष्टय़े, असल्यास आर्थिक महत्त्व, प्रत्येक भूरूपासाठी उपलब्ध असल्यास जागतिक पातळीवरील प्रसिद्ध उदाहरण, भारतातील व असल्यास महाराष्ट्रातील उदाहरण असे मुद्दे लक्षात घ्यावेत. या मुद्दय़ांच्या आधारे तुलनात्मक कोष्टक करता आल्यास लक्षात राहणे सोपे जाईल.

भौतिक/ प्राकृतिक भूगोलामध्ये नकाशावर आधारित किंवा बहुविधानी किंवा जोडय़ा लावणे अशा प्रकारचे संकल्पनात्मक प्रश्न विचारले जातात. यासाठी भूगोलाचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करायला हवा. नदीप्रणाली, पर्वतप्रणाली, प्राकृतिक विभाग, मान्सूनचे वितरण, मृदेचे वितरण, वनांचे प्रकार इ.बाबत संकल्पनात्मक आणि नकाशावर आधारित असे प्रश्न विचारले जाऊ शकतात.

भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदीप्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे. भारतातील पर्वतप्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिक महत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे. या नदी व पर्वतप्रणालीची उत्तर ते दक्षिण क्रमाने सलगता समजून घ्यायला हवी.

भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाचे असल्याने या भागाचा परिपूर्ण अभ्यास करायला हवा. खडकांचा प्रकार, निर्मिती, रचना, भौतिक व रासायनिक वैशिष्टये, निर्मितीसाठी आवश्यक भौगोलिक/ भूशास्त्रीय घटक, कोठे आढळतो, भौगोलिक व आर्थिक महत्त्व या मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यास करावा.

महाराष्ट्राच्या मुख्य हवामान विभागांचा नकाशाच्या आधारे अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागाची भौगोलिक वैशिष्टय़े, हवामानाचे वैशिष्टय़पूर्ण घटक, त्यामुळे होणारी मृदा, पिके, इतर आर्थिक उत्पादनांमध्ये या वैशिष्टय़ांचे योगदान या बाबी समजून घ्याव्यात. महाराष्ट्राचे हवामान विभाग हे दक्षिणोत्तर पसरले आहेत. त्यांचा पष्टिद्धr(१५५)म ते पूर्व अशा क्रमाने अभ्यास केल्यास मान्सून, पर्जन्याचे वितरण, तापमानातील फरक यांचा तुलनात्मक अभ्यासही शक्य होईल.

जागतिक भूगोलाचा फक्त प्रसिद्ध नद्या, पर्वत, प्राकृतिक विभाग इ.चा कोष्टकामध्ये मांडून केलेला फॅक्चुअल अभ्यास पुरेसा आहे.

The post एमपीएससी मंत्र : संकल्पनात्मक आणि प्राकृतिक भूगोल appeared first on Loksatta.from करिअर वृत्तान्त – Loksatta https://ift.tt/3d9NuK8
Source https://ift.tt/3dmx3ZV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या