
बारावी तसेच '१७ नंबर' अर्ज भरण्याला मुदतवाढ
मंगळवार, १४ डिसेंबर, २०२१
Comment

म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ मिळाली आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे आणि २८ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांतील नियमित विद्यार्थ्यांना सरल डेटाबेसच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १२ नोव्हेंबर आणि विलंब शुल्कासह २० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार होती. मात्र, अर्ज भरताना कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याचे राज्य मंडळाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनपर्रीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी खासगी आणि तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया १८ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या विद्यार्थ्यांना २८ डिसेंबरपर्यत सायंकाळी पाच वाजेपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या १७ नंबरचा अर्ज भरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळा; तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विलंब आणि अतिविलंब शुल्कासह २४ डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले.
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-board-extends-dates-for-ssc-hsc-private-candidates-registration/articleshow/88270315.cms
0 Response to "बारावी तसेच '१७ नंबर' अर्ज भरण्याला मुदतवाढ"
टिप्पणी पोस्ट करा