२०१८ मधील टीईटीचा पेपर देखील फुटला; माजी शिक्षण आयुक्तांना अटक

२०१८ मधील टीईटीचा पेपर देखील फुटला; माजी शिक्षण आयुक्तांना अटक

TET : टीईटी निकाल फेरफार प्रकरणी अटकेत असलेले राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान याचे धागेदोरे २०१८ च्या सीईटी परीक्षांपर्यंत पोहोचले आहेत. २०१८ मधील टीईटीचा पेपर देखील फुटल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी माजी शिक्षण आयुक्तांना अटक केली आहे. शिक्षक पात्रता परिक्षा (TET) सन २०१८ परीक्षेच्या निकालामध्येही फेरफार केल्याची माहिती जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा मॅनेजर अश्विन कुमार याने पोलीस चौकशी दरम्यान दिली. तत्कालिन राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांच्या संगनमताने हा फेरफार झाल्याची माहिती त्याने दिली. म्हाडा पेपर फुटी संदर्भात आरोपी नामें जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख व त्याचे साथीदार एजंट नामे संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना अटक करण्यात आली असून सखोल तपास सुरु आहे. तसेच शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२०२० संबंधी गुन्हयातील अटक आरोपी अभिषेक सावरीकर यांची देखील चौकशी केली जात आहे. या तपासामध्ये सन २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (TET) मध्येही त्यांनी तत्कालीन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यासह परीक्षांचे आयोजन करणारे जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचा तत्कालीन मॅनेजर व त्यांच्या सहकाऱ्यांची नावे घेतली. त्यांच्या संगनमताने अपात्र परिक्षार्थींकडून पैसे स्वीकारून त्यांना परिक्षेच्या निकालात फेरफार करून पात्र दाखविल्याचे तपासात उघड झाले होते. सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी ही कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तर्फे इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा, टायपिंग आणि शॉर्ट हॅंड परीक्षा, ईबीसी शिष्यवृत्ती परीक्षा, खात्याअंतर्गत सेवा परीक्षा, डि.एल.ई.डी. इत्यादी परीक्षांचे आयोजन खासगी कंत्राटी कंपन्यामार्फत शिक्षण विभागाकडून केले जाते. त्यासाठी सन २०१८ मध्ये निघालेल्या शिक्षक पात्रता परिक्षेच्या जाहिरातीनुसार जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीने ही परीक्षा आयोजित केली होती. त्याचा अंतिम निकाल १२ ऑक्टोबर २०१८ रोजी लागला होता. त्या कंपनीचा महाराष्ट्रातील मॅनेजर अश्विन कुमार याच्यावर परीक्षेचे आयोजन आणि निकाल प्रसिध्द करण्याची जबाबदारी होती. त्याचाच फायदा घेवून जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचे मॅनेजर अश्विन कुमार याने परीक्षा कालावधीत नेमणुकीस असलेले तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे (दि. ०६ ऑगस्ट २०१६ ते दि. ३१ ऑगस्ट २०१८) आणि २) तुकाराम सुपे (दि. ३१ ऑगस्ट २०१८ ते दि. १७ डिसेंबर २०२१) आणि त्यांचे सहकारी प्रितीश देशमुख, अभिषेक सावरीकर, सौरभ त्रिपाठी, संतोष हरकळ, अंकुश हरकळ या सर्वांच्या संगनमताने शिक्षक पात्रता परीक्षेच्या ऑक्टोबर २०१८ मधील निकालात गैरव्यवहार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपात्र असलेल्या ५०० परिक्षार्थींकडून प्रत्येकी ५० ते ६० हजार घेऊन त्यांची नावे घुसवून त्यांना पात्र असल्याचे दाखवून प्रामाणिक परिक्षार्थीची व शासनाची फसवणूक केली असल्याचे उघड झाले. याप्रकरणी आरोपी सुखदेव हरी डेरे याला अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय या गुन्हयातील आरोपी आणि जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीचा तत्कालीन मॅनेजर अश्विन कुमार याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/tet-paper-leaked-2018-tet-paper-also-leaked-former-education-commissioner-arrested-by-pune-cyber-police/articleshow/88407369.cms

0 Response to "२०१८ मधील टीईटीचा पेपर देखील फुटला; माजी शिक्षण आयुक्तांना अटक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel