Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१, डिसेंबर २४, २०२१ WIB
Last Updated 2021-12-24T08:00:31Z
Rojgar

झेडपीच्या शाळेत गणिताची जादू; प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांनी अनुभवले 'मॅथेमॅजिक'

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद डोंगर, झाड किंवा एखाद्या इमारतीची उंची मोजायची कशी, द्विमिती आकृतीवरून त्रिमिती आकृतीच्या घनफळाचे सूत्र, त्रिकोणाचे गुणधर्म अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सोप्यात सोप्या प्रयोगातून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी मांडली अन् काही तासांच्या प्रदर्शनात गणितीय क्रिया, संकल्पना जाणून घेण्यासाठी शहरातील शाळांमधील शिक्षक, विद्यार्थ्यांची तुडुंब गर्दी जमली. निमित्त होते गणित प्रात्यक्षिक प्रदर्शनाचे. १०० प्रात्यक्षिकातून १४० गणितीय संकल्पना सोप्या, सहज शब्दात दोन शाळांचे विद्यार्थी मांडतानाचे मॅथेमॅजिक शेकडो विद्यार्थ्यांनी अनुभवले. गणित सोडवणं हे कठीण काम आहे, असं मनाशी ठरवून अनेकजन विषयाकडे दुर्लक्ष करतात. असा हा विषय सोपा, आवड निर्माण होईल यावर अंबेलोहळ जिल्हा परिषद शाळेतील नीळकंठ लोसरवार, आडुळच्या जिल्हा परिषद शाळेचे एन. एस. चरपेलवार यांनी काम केले, प्रयोगशाळा उभारली. या गणितीय प्रयोगशाळेचे गणित दिनानिमित्त प्रदर्शन औरंगाबादमध्ये भरविण्यात आले. उस्मानपुऱ्यातील कलश मंगल कार्यालयात आयोजित या प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिकांद्वारे गणितीय संकल्पना मांडल्या, समजून सांगितल्या. संख्या प्रकारपासून लसावी, मसावी, त्रिकोणमिती गुणोत्तरे, त्याचे गुणधर्मे, द्विमिती आकृतीवरून त्रिमिती आकृतीच्या घनफळाचे सुत्र विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकातून मांडले. शिक्षक, विद्यार्थ्यांनी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. विद्यार्थ्यांकडून गणितीय समिकरण समजून घेत होते. प्रारंभी प्रदर्शनाचा उदघाटन समारंभ पार पडला. प्रास्ताविक सुजाता अवचट यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे, राजेश हिवाळे यांनी तर आभार प्रशांत हिवर्डे यांनी मानले. शंभर प्रयोग; १४० संकल्पनांचा अभ्यास प्रदर्शनात गणितीय प्रयोगशाळेतील शंभर प्रात्यक्षिक मांडण्यात आले. ज्यातून १४० संकल्पना सांगत त्याबद्दल माहिती विद्यार्थी देत होते. विद्यार्थ्यांच्या मनात अनेकदा संभ्रम निर्माण करणाऱ्या अनेक संकल्पना सोप्या पद्धतीने मांडण्यात आल्या. भूमितीतील मूलभूत संबोध, चौकोन वर्तुळ याचा संबंध, बिंदू रेषा, एकरेषीय, नैकरेषीय, समांतर रेषा, असमांतर रेषा, कोन व लंबदुभाजक, कोनाचे प्रकार, रेषीय जोडीतील कोन, कोनांच्या जोड्या, समांतर रेषा व छेदिका,आंतरकोनाचा गुणधर्म, त्रिकोणाच्या तीन बाजूच्या लांबीतील संबंध, त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज, समांतर रेषांच्या गुणधर्माचा उपयोग, समद्विभुज त्रिकोणाचे गुणधर्म, त्रिकोणाचे बाह्य कोन दुरुस्थअंतर कोन, पतंगाचे गुणधर्म ३०, ६०, ९० अंश मापाच्या त्रिकोणाचे गुणधर्म, पायथागोरसच्या नियमाचा पडताळा, शिरोलंब व मध्यगा,अपूर्णांक संख्याच्या गुणाकाराचे नियम, दशांश संख्येचे विस्तारित रूपात मांडणी, विस्तारसूत्राच्या क्षेत्रफळाच्या मदतीने पडताळा घेणे, तास, लिटर, रुपये, मीटर यांची बेरीज, वजाबाकी, मापं, घड्याळातील काटा व कोन, चिट्टी व सूची,कलरच्या सूत्राचा पडताळा अशा संकल्पना होत्या. गणित अवघड विषय नाही तर, सोपा आहे. कृतीयुक्त शिक्षणातून आमची भीती दूर झाली आणि आज आम्ही प्रात्यक्षिकातून विविध संकल्पना मांडू शकतो. घड्याळातील काटा व कोन अशा प्रयोगाबाबत मी माहिती दिली. - अनिकेत चंदने त्रिकोणमितीय गुणोत्तरे त्याचे गुणधर्म हे प्रात्यक्षिकातून मी सांगण्याचा प्रयत्न केला. गणितीय प्रयोगशाळेत आम्हाला छोटे-छोटे प्रयोग करायला शिकवले जाते. जेणेकरून विषयाचे ज्ञान सहज आत्मसात करता येते. - रवींद्र डंगरे कोनाचे प्रकार, जोडे ब्लॉकच्या मदतीने विविध अपूर्णांक संकल्पना, अपूर्णांक संख्या तयार करणे असे वेगवेगळ्या संकल्पनावर आधारित प्रयोग सादर केले. अनेकांनी आमच्याकडून समजून घेतले, याचा आनंद आहे. - कोमल प्रधान द्विमिती आकृतीवरून त्रिमिती आकृतीच्या घनफळाचे सुत्र सहज सोप्या शब्दात प्रात्यक्षिकाच्या रुपात मांडण्याचा माझा प्रयत्न होता. आम्ही मैत्रिणींनी आयाताचे क्षेत्रफळ, वर्तुळाचा परीघ, दंडगोल, शंकू, पूर्णगोल, अर्धगोलचे घनफळ कसे मोजायचे हे सांगितले. - उर्मिला प्रधान आमच्या शाळेतील गणित प्रयोगशाळेत नवनवीन संकल्पनावर आम्हाला सरांकडून मार्गदर्शन होते. प्रात्यक्षिकांवर आधारित प्रयोगातून विषयाचे शिक्षण मिळते त्यामुळे आमच्या मनातील गणित विषयाची भीती दूर झाली. इतरांची भीती दूर करण्याचा आज आम्ही प्रयत्न केला. - अंजली साध्ये चक्रीय चौकोनाचे समुख कोन हे पुरक कोन असतात याबाबत मी, माहिती दिली. यासह अर्धवर्तुळातील प्रत्येक कोन हा काटकोन असतो. वर्तुळाचा कंस अर्धवर्तुळापेक्षा जास्त, कमी असेल तर कंसावरील कोण कसा असतो हे प्रात्यक्षिकाद्वारे मांडले. - अनुष्का गिरी


source https://maharashtratimes.com/career/career-news/mathemajic-in-aurangabad-zp-school-mathematics-exhibition-of-students/articleshow/88467752.cms