
म. टा. प्रतिनिधी, पुणे औषधनिर्माण (Pharmacy) पदविका (Diploma ) अभ्यासक्रमांसाठी गेल्या २५ वर्षांपासून राबवण्यात आलेला अभ्यासक्रम अखेर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य तंत्रशिक्षण मंडळाने () शैक्षणिक वर्ष २०२१ पासून नवा अभ्यासक्रम लागू केला आहे. या अंतर्गत अध्यापन व परीक्षा पद्धती तयार केली असून, त्याला 'जे स्कीम' असे नाव देण्यात आले आहे. या शैक्षणिक वर्षापासूनच हा अभ्यासक्रम लागू होणार असल्याने यंदा फार्मसीच्या डिप्लोमाला प्रवेश घेणारे विद्यार्थी नव्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेणार आहेत. केंद्र सरकारतर्फे फार्मसीच्या डिप्लोमासाठी शैक्षणिक अधिनियम २०२० प्रसिद्ध करण्यात आले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (Pharmacy Council of India, PCI) दिल्या होत्या. यामुळे यंदा फार्मसीचे विद्यार्थी नव्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेतील, असा निर्णय तंत्रशिक्षण मंडळाने घेतला आहे. तंत्रशिक्षण मंडळाने संबंधित अभ्यासक्रमाची परीक्षा घेण्यासाठी अध्यापन आणि परीक्षा पद्धती तयार केली असून, ही पद्धत 'जे स्कीम' म्हणून राबविण्यात येईल. ही परीक्षा पद्धती व नवा अभ्यासक्रम तंत्रशिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थी आणि संबंधित अध्यापक यांच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी संस्थाप्रमुखांवर आहे, असे तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी स्पष्ट केले आहे. काय आहे 'जे स्कीम' फार्मसीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार पदविकेच्या प्राध्यापकांनी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन करावे, यासाठी 'जे स्कीम' तयार करण्यात आले आहे. या शिवाय विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा असतील, त्यासाठी किती क्रेडिट, गुण मिळतील, याचीही माहिती या 'जे स्कीम'मध्ये देण्यात आली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/msbte-to-change-pharmacy-diploma-syllabus-as-per-pharmacy-council-of-india-guidelines/articleshow/88580741.cms
0 टिप्पण्या