Health Department Recruitment: आरोग्य अधिकाऱ्यांची ३७० पदे भरणार

Health Department Recruitment: आरोग्य अधिकाऱ्यांची ३७० पदे भरणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्यातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदभरती, नव्याने इमारतींचा विकास तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी दर्जाची ३७० पदे भरली जाणार आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. काँग्रेसचे सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी राज्यातील आरोग्य विभागाशी संबधित उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना टोपे बोलत होते. सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. रिक्त जागांची १०० टक्के भरती करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत विशेष तज्ज्ञांच्या आठ हजार ३३५ जागांपैकी सात हजार ९८१ जागांवर भरती करण्यात आली आहे. तीन हजार ३५७ वैद्यकीय अधिकारी जागा भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी दोन हजार ६११ जागांवर भरती करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर ४६२ जागा पदोन्नतीने भरल्या आहेत. तर ३७० पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र् राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे. गेल्या २४ जानेवारी २०१८च्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३०० खाटांची रुग्णालये खासगी सार्वजनिक भागिदारी तत्त्वावर चालवण्याबाबत त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, प्रत्येक जिल्हा रुग्णालयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. नवीन शासकीय रुग्णालय मंजूर झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात सामंजस्य करार करण्यात येत आहेत, असे टोपे यांनी उत्तरात नमूद केले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य विभागाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात येत आहे. राज्यातील आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा विकास कामांसाठी आशिया विकास बँकेकडून पाच हजार १७७ कोटी रुपये, तर हुडकोकडून तीन हजार ९९४ कोटी रुपये कर्ज घेतले जाणार आहे. यातून श्रेणीवर्धन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेल्या संस्थेचे बांधकाम, यंत्रसामग्री उपकरणे खरेदी, मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे टोपे यांनी सांगितले.


source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-health-department-recruitment-370-posts-to-be-filled-by-mpsc-informs-minister-rajesh-tope-in-legislative-council/articleshow/88557927.cms

0 Response to "Health Department Recruitment: आरोग्य अधिकाऱ्यांची ३७० पदे भरणार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel