MIT Pune: 'एमआयटी'मधील १३ विद्यार्थ्यांना करोनाची लागण

MIT Pune: 'एमआयटी'मधील १३ विद्यार्थ्यांना करोनाची लागण

म. टा. प्रतिनिधी, पुणे एमआयटी विश्व शांती विद्यापीठाच्या (MIT) कोथरूड येथील कॅम्पसमधील १३ विद्यार्थ्यांना करोनाची (Corona) लागण झाल्याचे समोर आले आहे. हे विद्यार्थी मॅकॅनिकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी असल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आहे. हे विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्तरावरील 'सुप्रा' या स्पर्धेची तयारी करत होते. करोनाची लागण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून स्पर्धेची तयारी करण्यासाठी 'एमआयटी'च्या २५ विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वर्कशॉपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. या वर्कशॉपमध्ये हे सर्व विद्यार्थी एकत्र वावरत होते. यापैकी काही विद्यार्थी करोनाबाधित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आल्याने २५ पैकी १३ विद्यार्थ्यांमध्ये करोनाचा संसर्ग झाला आहे. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची करोना चाचणी 'निगेटीव्ह' आली असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वर्कशॉपच्या एका बाजूला स्पर्धेची तयारी करीत असल्याने या विद्यार्थ्यांचा संपर्क इतर कोणाशीही आला नसल्याचेही विद्यापीठाने सांगितले आहे. सर्व बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी करोना 'पॉझिटिव्ह' आल्याने इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाने आजपासून केवळ दोन डोस असलेल्या विद्यार्थ्यांनाच विद्यापीठ परिसरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाविषयक सर्व नियमांचे पालन सरकारने करोना प्रतिबंधासाठी लावलेल्या सर्व नियमांचे पालन आम्ही करीत आहोत. महाविद्यालय सुरू झाल्यापासून ज्या विद्यार्थ्यांचे लशीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, त्यांनाच प्रवेश दिला जात आहे. याशिवाय आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना सर्व उपाययोजना उपलब्ध करून दिल्या आहेत. करोनाबाधित असलेल्या एकाही विद्यार्थ्याला 'ओमायक्रॉन'ची लागण झाली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. - प्रा. डॉ. प्रशांत दवे, कुलसचिव, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ


source https://maharashtratimes.com/career/career-news/13-students-test-covid-19-positive-at-mit-pune-world-peace-university-affiliated-institution/articleshow/88536181.cms

0 Response to "MIT Pune: 'एमआयटी'मधील १३ विद्यार्थ्यांना करोनाची लागण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel