
म. टा. प्रतिनिधी, नाशिक इंजिनीअरिंग पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी प्रसिद्ध झाली असून, शनिवारपासून (दि. ४) या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची सूचना देण्यात आली आहे. पहिल्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना ७ डिसेंबरपर्यंत आपले प्रवेश संबंधित कॉलेजमध्ये निश्चित करावे लागणार आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. यामध्ये इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १९ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ३ डिसेंबरला पहिल्या फेरीतील पात्र विद्यार्थी व त्यांना मिळालेल्या महाविद्यालयांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, आता या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन ४ ते ७ डिसेंबरपर्यंत ही प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करून रिपोर्टिंग सेंटरद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सीईटी सेलतर्फे करण्यात आले आहे. इंजिनीअरिंगसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी तीन कॅप राऊंड घेतले जातात. कोव्हिड प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षीपासून बदललेल्या शैक्षणिक नियोजनाचा फटका या प्रवेश प्रक्रियेला बसला असून, यंदा मात्र इंजिनीअरिंगसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दोनच कॅप राऊंड घेतले जाणार असल्याचे सीईटी सेलमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. ८ रोजी दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी व जागा वाटप जाहीर केले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाची १९ महाविद्यालये असून, यामध्ये एकूण ७ हजार ५३० जागा उपलब्ध आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DoazU4
Source https://ift.tt/310mqee
0 टिप्पण्या