
म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणपत्रिका आणि 'पासिंग सर्टिफिकेट'वर विद्यार्थ्यांचे छायाचित्र येणार असून, येत्या सत्र परीक्षेच्या निकालानंतर निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. गुणपत्रिकांची छपाई आता लेझर प्रिंटरच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे गुणपत्रिकेचा दर्जा अधिक काळ चांगला राहण्यासाठी मदत होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सूचनेनंतर पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागाने याबाबतचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी आगामी सत्र परीक्षेनंतर करण्यात येणार आहे. गुणपत्रिका आणि पासिंग सर्टिफिकेटचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने परीक्षा आणि मूल्यमापन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुणपत्रिका आणि पासिंग सर्टिफिकेटवर विद्यार्थ्यांचे पासपोर्ट साइझ छायाचित्र छापण्यात येणार आहे. याद्वारे गुणपत्रिकेसोबत छेडछाड करण्यावर मर्यादा येणार आहे. गुणपत्रिकांची छपाई यापूर्वी 'डॉट मॅट्रिक्स प्रिंटर'च्या माध्यमातून व्हायची. मात्र, यापुढे गुणपत्रिकांची छपाई लेझर प्रिंटरच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे गुणपत्रिकेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली. ''ट्रान्स्क्रिप्ट' मिळण्याचा कालावधी कमी आणणार' परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र, लिव्हिंग सर्टिफिकेट आदी शैक्षणिक कागदपत्रांसह ट्रान्स्क्रिप्ट प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, हे प्रमाणपत्र मिळण्यात अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येतात; तसेच प्रमाणपत्र मिळण्यासाठी अधिक कालावधी लागतो, अशी विद्यार्थी-पालकांची तक्रार असते. यावर उपाय म्हणून ट्रान्स्क्रिप्ट प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी ४८ तासांपर्यंत आणण्याचा परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. साधारण २००७-०८नंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे संगणकीय प्रणालीत उपलब्ध आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आवश्यकतेप्रमाणे शक्य तितक्या लवकर उपलब्ध करून देण्यात येते, असे संचालक डॉ. काकडे यांनी सांगितले. पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र, ट्रान्स्क्रिप्ट अशा प्रकारची कागदपत्रे कमी कालावधीत उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या सर्व कागदपत्रांचे डीजिटायझेशन करण्यात येत आहेत. त्याचाच टप्पा म्हणून नॅशनल अॅकॅडेमिक डिपॉझिटरीच्या (नॅड) पोर्टलवर तीन लाख पदवी प्रमाणपत्रे अपलोड करण्यात आली असून, ही प्रक्रिया अधिक वेगवान करण्यात येत आहे. - डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ok7oJ1
Source https://ift.tt/310mqee
0 टिप्पण्या