
SSC, HSC : राज्यात करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांकडून २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही. या परीक्षेत सहभागी होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे हयात पालक अथवा कायदेशीर पालक/ दत्तक पालक गमावलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊन पुढील वाटचाल खंडीत होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील अशा बाधित विद्यार्थ्यांचे व्यापक हित विचारात घेऊन महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२१-२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावी या परीक्षेस सहभागी होणाऱ्या अशा नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. करोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा १५ डिसेंबरनंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांतील इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या शाळा आता १५ डिसेंबर वा त्यानंतरच सुरू होऊ शकतील. मुंबईसह राज्यभरातील करोनास्थिती झटाट्याने निवळत असताना पहिली ते सातवी इयत्तांच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू होतील, अशी अपेक्षा होती. तब्बल २० महिने शाळांचे तोंडही न पाहिलेले विद्यार्थी व त्यांचे पालकही शाळांचे दार उघडण्याच्या प्रतीक्षेत होते. शाळा सुरू करताना कोणते नियम पाळावेत, याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही राज्यात जारी करण्यात आल्या होत्या. अर्थात, शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार स्थानिक महापालिका, पालिका यांच्यावर सोपवण्यात आले होते. आणि याच पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनची जोरदार चर्चा सुरू झाल्याने अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती, व मंगळवारी ती खरी ठरली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31mmTY3
Source https://ift.tt/310mqee
0 टिप्पण्या