शिक्षकभरतीत अधिकाऱ्यांचा 'खो'; उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यास टाळाटाळ Rojgar News

शिक्षकभरतीत अधिकाऱ्यांचा 'खो'; उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यास टाळाटाळ Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्याच्या शिक्षकभरती () मधील २०६२ जागांसाठी संस्थाचालकांनी उमेदवारांच्या मुलाखती झाल्यावर, पात्र उमेदवारांना शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून निय़ुक्तीची पत्रे देणे अपेक्षित होते. मात्र, काही जिल्ह्यांत शिक्षणाधिकाऱ्यांनी आर्थिक देवाण-घेवाणीसाठी नियुक्ती पत्रे दिली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिक्षकभरतीसाठी मुलाखती दिलेले उमेदवार संस्थेच्या आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत असून, त्यांना केवळ 'तारीख पे तारीख' मिळत असल्याचे उमेदवारांनी सांगितले. राज्यात सरकारी आणि अनुदानित संस्थांमध्ये पवित्र पोर्टलमार्फत साधारण १२ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेत संस्थेच्या सहावी ते बारावीच्या अनुदानित शाळांमध्ये रिक्त असणाऱ्या २०६२ जागांसाठी ऑक्टोबर महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीत एका जागेसाठी दहा पात्र उमेदवार संस्थांना देण्यात आले होते. त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झाला. त्यानंतर संस्थाचालकांनी निवडलेल्या उमेदवारांची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालय आणि संबंधित उमेदवारांना पत्राद्वारे दिली. शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत संबंधित उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती पत्र देत, त्यांना तातडीने शाळांमध्ये रूजू करणे अपेक्षित होते. मात्र, डिसेंबर उजाडला तरी, राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शिक्षण विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी करण्यास चालढकल केली जात आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील संबंधित कर्मचारी प्रतिसाद देत नाहीत. उमेदवार; तसेच काही संस्थांचे प्रतिनिधी शिक्षण विभागात चकरा घालून थकले. या परिस्थितीत आर्थिक लाभासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून भरती प्रक्रिया जाणिवपूर्वक रेंगाळत ठेवली जात असल्याचे उमेदवारांनी सांगितले. त्यामुळे नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांमध्ये निराशा पसरत असून, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी पुढे आली आहे. दरम्यान, विलंबासाठी शालेय शिक्षण विभागाकडून तांत्रिक अडचणीचे कारण देण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयात 'बाबूगिरी' शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतील उमेदवारांकडे रोजगाराचे साधन नसल्याने, त्यांना नोकरीची प्रतिक्षा करावी लागली. आता संधी मिळत असताना 'बाबूगिरी'च्या कचाट्यात नोकरभरती अडकत आहे. मुलाखती दिलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी कधी होणार, त्यांना कामावर रूजू होण्याचे आदेश कधी मिळतील, शालार्थ आयडीची प्रक्रिया कधी होईल, याबाबत काहीही माहिती उमेदवारांना समजू शकत नाही. त्यामुळे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी उमेदवारांकडून व्यक्त होत आहे. राज्यातील संस्थाचालकांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन, त्यातील पात्र उमेदवारांना पत्राद्वारे निवड झाल्याचे कळवले. शिक्षणाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून, त्यांना नियुक्ती पत्रे देणे गरजेचे होते. मात्र, केवळ आर्थिक लाभासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी भरती प्रक्रिया अडवल्याचे चित्र आहे. विलंबासाठी 'एनआयसी'च्या संगणकीय प्रणालीत बदल करण्यात येत असल्याचे कारण शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून देण्यात येत आहे. अशा परिस्थितीत ऑफलाइन प्रक्रिया करून नियुक्ती पत्रे द्यावीत. - संतोष मगर, अध्यक्ष, डीडीएट बीएड स्टुडन्ट असोसिएशन


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3y9bmrc
Source https://ift.tt/310mqee

0 Response to "शिक्षकभरतीत अधिकाऱ्यांचा 'खो'; उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यास टाळाटाळ Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel