TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

School Reopen: नाशिकमध्ये दीड वर्षानंतर पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु

: १ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या राज्यातील शाळांना १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पण ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अद्याप याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला नाही. दरम्यान नाशिक शहरात दीड वर्षानंतर इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग आजपासून सुरू होत आहेत. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्वसाठी शाळांमध्ये सजावट करण्यात आली आहे. फुगे, पुष्परचना आणि रांगोळ्यांनी शालेय प्रांगण सजले आहे. शाळांमध्ये विद्यार्थी येण्यास सुरुवात झाली असून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात आहे. राज्यातील करोना केसेस नियंत्रणात आल्यानंतर १ डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरु होणार होत्या. यानंतर ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या पण त्याचवेळी ओमायक्रॉनच्या भीतीने शहरांतील शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. यानुसार १५ डिसेंबरनंतर शाळांबाबतचा निर्णय होणार आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळा उघडण्यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. राज्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगितले. राज्यात एक डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. त्यानंतर ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. मात्र ओमायक्रॉन या करोना विषाणू प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला होता. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण क्षेत्रातून प्राथमिक शाळा सुरू करण्याची आग्रही मागणी होत आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक पातळीवर मतभिन्नता असल्याने, त्याबाबतचा निर्णय राज्यस्तरावर घेतला जाणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. 'प्रत्येक जिल्ह्यातील करोनाची स्थिती पाहून शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेताना स्थानिक पातळीवर मतभिन्नता आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा; तसेच भवितव्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत याबाबत निर्णय घेतला जाईल', असे अजित पवार म्हणाले. मार्गदर्शक सूचना शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड लसीकरण (दोन लसी) झालेल्यांनाच शाळा/ कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड-१९ साठीची ४८ तासापूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मास्कने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे. शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अथवा स्पर्श होईल अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका देखील शक्यतो ऑनलाईन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/school-reopen-classes-from-1st-to-7th-started-in-nashik-after-one-and-half-years/articleshow/88250690.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या