Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २२ डिसेंबर, २०२१, डिसेंबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-12-22T08:00:04Z
Rojgar

TET Exam Scam: यापूर्वी अटक झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पुढे काय झाले?

Advertisement
शैलेन्द्र तनपुरे राज्य परीक्षा मंडळाचे आयुक्त तुकाराम सुपे यांना भ्रष्टाचार प्रकरणात झालेल्या अटकेने, पुरोगामी महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचे आणखी किती धिंडवडे निघणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक असतानाही सुपे यांनी २०१३ ते २०१६ अशी तीन वर्षे उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यांतील शिक्षण संस्था, शिक्षक व पालकांना कसे सळो की पळो करून सोडले होते, याच्या चित्तरकथा सध्या चर्चिल्या जात आहे. तेव्हा सुपेंचे खासमखास असलेले शिक्षण क्षेत्राशी संबंधित (ज्यांना दलाल म्हणूनही संबोधले जाते) अनेक जण सुपेंना अटक होताच, समाज माध्यमांवरून गायब झाले. सहा महिन्यांपूर्वी याच विभागाच्या आणखी एक अधिकारी वैशाली वीर-झनकर यांनाही लाच घेताना पकडले होते. तत्पूर्वी रामचंद्र जाधव, नितीन बच्छाव, प्रवीण पाटील व किशोर पाटील अशा याच खात्यातील नाशिक-धुळ्याच्या पाच अधिकाऱ्यांवर लाचेपासून ते अटकेपर्यंतची कारवाई झाली आहे. या सर्वांचा मेरुमणी ठरावा, असे सुपेंचे कर्तृत्व आहे. पेपरफुटीची प्रकरणे एकापाठोपाठ उघडकीस आल्याने, शासकीय भरतीतील परीक्षा यंत्रणेचा जो उकिरडा सध्या उकरला जात आहे, त्यातून तुकाराम सुपेंसारख्या शिक्षण खात्यातील अनेक नरपुंगवांच्या कहाण्या बाहेर पडत आहेत. सुपेंच्या जावयाच्या घरी कोट्यवधींची रक्कम सापडल्याने, त्यांच्या इतर नातेवाइकांकडेही पोलिसांनी नजर वळवली आहे. जावई भला होता, म्हणून कोट्यवधी सांभाळून ठेवले; पण व्याही (सुपेंच्या मुलाचे सासरे) तर म्हणे त्यांचे सरकारी वाहन चालकच आहेत. ते स्वत:ची चारचाकी घेऊन कामावर येतात आणि नंतर सरकारी वाहन चालवितात. जावयांपाठोपाठ आता या व्याह्यांकडेही लक्ष दिल्यास बरीच माया बाहेर येऊ शकेल. उत्तर महाराष्ट्रात शिक्षण उपसंचालक असताना या महाशयांनी शिक्षणसेवकांना पदोन्नतीसह बोगस मंजुरी देण्यापासून शाळांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, शिक्षक मान्यता, शाळा मान्यता, संस्थांच्या चौकशा, संस्थांतर्गत वाद, हेतुत: तक्रारदाराला कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावणे, पालकांच्या तक्रारींची दखल न घेता संस्थाचालकांची री ओढणे अशा असंख्य प्रकरणात प्रचंड माया जमविल्याची चर्चा आहे. तेव्हाही दबक्या आ‌वाजात बोलले जायचे; परंतु मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची असा प्रश्न होता. सुपे व रामचंद्र जाधव ही माणसे झपाझप बढतीच्या पायऱ्या चढत गेली आणि एके काळी साहेब असलेल्यांच्या डोक्यावर जाऊन बसली. आज शिक्षण खात्यातील एवढी बजबजपुरी उघड होऊनही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची तंद्री भंग पावलेली नाही. अर्थात, तो त्यांचा दोष नाही. तो या खात्याचाच ‘लसावि’ असावा. गायकवाडांच्या पूर्वसुरींनीही सुपे वा जाधव यांच्यासारख्यांना कधीच हात लावला नाही. उलट अशांना मोक्याच्या जागांचे भालदार चोपदार बनविले. काही वर्षांपूर्वी ठाणे येथे शिक्षणाधिकारी असतानाही सुपेंना लाचलुचपत खात्याने पकडले होते. त्यानंतरही त्यांची कर्तृत्वाची भरारी थेट परीक्षा परिषदेच्या अत्यंत कळीच्या अशा आयुक्तपदापर्यंत पोहोचत असेल, तर हे खाते किती किडलेले आहे व मंत्री कसे नामधारी आहेत, याची प्रचीती येते. एकट्या उत्तर महाराष्ट्रात वर्षभरात अनेक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊनही शिक्षण खाते ढिम्म राहणार असेल, तर शिक्षणाच्या दर्जासाठी एके काळी नामांकित ठरलेल्या महाराष्ट्राचे भविष्य काय, असा प्रश्न पडतो. पेपरफुटीचे हिमनगाचे टोकच बाहेर पडले आहे. दररोज होणाऱ्या कारवाया पाहिल्यानंतर काही दिवसांनी हे खाते बिनकामाचे व बिनमाणसांचे झाल्यास आश्चर्य वाटू नये. सुपेंचे पूर्वसूरी सुखदेव डेरे यांनाही अटक झाल्याने, परीक्षा परिषद भ्रष्टाचाऱ्यांना पोसण्यासाठीच काढली होती काय, असे वाटते. हे डेरेही नंदूरबारला शिक्षणाधिकारी होते. नाशिक विभागीय शालान्त मंडळाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. यांना अटक झाली आहेच, तर त्यांनी जेथे जेथे काम केले, तेथील कारभाराचेही उत्खनन व्हावे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या आदिवासी तालुक्यांमध्ये सुपेंनी जमिनींमध्ये बरीच नामी वा बेनामी गुंतवणूक केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याचाही शोध घेतला जावा. यापूर्वी अटक झालेल्या या खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुढे काय झाले, याचा लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात जाब विचारावा. राजकीय पक्ष अशा प्रकरणात फार खोलात शिरत नाहीत, म्हणून हे असे अधिकारी शिरजोर होतात. शिक्षण व्यवस्थेलाच नख लावणाऱ्या अशा प्रवृत्तींना सरकार आळा घालणार आहे की नाही? की ‘हा आपला आणि तो परका’ असे करीत भावी पिढ्या बरबाद करीत राहणार आहे?


source https://maharashtratimes.com/career/career-news/tet-paper-scam-what-happened-to-the-officers-and-employees-who-were-arrested-earlier/articleshow/88424853.cms