
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई राज्यभरातील शाळा पुन्हा सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर आता सर्वांचे लक्ष कॉलेजांच्या निर्णयाकडे लागून राहिले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला असून, याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी शुक्रवारी दिली. राज्यात करोनारुग्णांची संख्या वाढू लागल्याने सर्व विद्यापीठे, तसेच स्वयंअर्थसहायित, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर सरकारने आता १५ ते १८ वयोगटाचे सध्या करोनाप्रतिबंधक लसीकरण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले असल्याने कॉलेजे सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे यासंदर्भातील प्रस्ताव आता मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून, १५ फेब्रुवारीआधी कॉलेज सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. साधारण १ फेब्रुवारीपासून कॉलेज सुरू करणे शक्य आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरू आहेत. बाकी सर्व वसतिगृहे मात्र बंद असून, त्यांच्याबाबतही निर्णय अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. करोना व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. यानुसार राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कॉलेजे ऑफलाइन सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यांनी मान्यता दिल्यानंतर कॉलेजे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. - उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री
source https://maharashtratimes.com/career/career-news/colleges-in-maharashtra-higher-education-minister-uday-samant-sent-proposal-to-cm-for-reopening-of-colleges/articleshow/89052752.cms
0 टिप्पण्या