Advertisement

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त ठरलेली आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेच्या निकालाच्या प्रतीक्षेमुळेही उमेदवार चिंतेमध्ये सापडले आहेत. या भरती प्रक्रियेत गट क पदासाठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या निकालाची प्रतीक्षा कायम आहे. प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून, निकाल जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील वेगवेगळ्या विभागातील भरतीच्या प्रक्रिया रेंगाळल्या आहेत. त्यातच, आरोग्य विभागातील प्रक्रिया चर्चेचा विषय ठरली होती. परीक्षेला विलंब, प्रवेश केंद्रांचा गोंधळ आणि त्यानंतर पेपरफुटींमुळे ही प्रक्रियाच वादग्रस्त ठरली आहे. अलिकडेच गट क मधील काही पेपर फुटल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पण ५२ पैकी कोणते पद आणि कोणत्या सत्रातील पेपर फुटला झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे, उर्वरीत पदांचा निकाल किती दिवस रोखून ठेवणार, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे. आरोग्य विभाग गट क ५२ सर्वंगासाठी दोन हजार सातशे पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी राज्यात २४ ऑक्टेबर रोजी दोन सत्रात परीक्षा पार पडली. परंतु ५२ पैकी नेमका कोणत्या पदाचा आणि सत्राचा पेपर फुटला झाला आहे हे अद्याप तरी पोलीसांनी उघड केलेले नाही. मनुष्यबळाचा प्रश्नही सुटेल या परीक्षेत मेहनतीने अभ्यास करुन गुण प्राप्त करणारे विद्यार्थ्यांचा मोठा वर्ग आहे. या परीक्षेत बहुसंख्या विद्यार्थ्यांच्या गुणांचा विचार करता ते सामान्य गुण असल्याचे २४ नोव्हेंबर रोजीच्या गुणांच्या यादीवरून लक्षात येते. विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन संबंधित विभागाचा निकाल जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. करोनाचा प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाला मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या परीक्षेचा लवकर अंतिम निकाल लावून नियुक्ती दिल्यास मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची उपलब्धता होणार आहे. पोलीस तपासांती ज्या पदाचा पेपर फुटला झाला हे सिध्द होईल, त्यांची परत परीक्षा घ्यावी. मात्र, अन्य पदांचा निकाल लावून उमेदवारांना न्याय द्यावा, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/health-department-recruitment-exam-2021-candidates-are-waiting-for-exam-result/articleshow/88870150.cms