TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

पुण्यातील शाळांबाबत आज होणार निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरात करोना रुग्णांची वाढत असलेली संख्या तसेच मुंबई महापालिकेने पहिली ते नववीपर्यंतच्या प्रत्यक्षातील शाळा बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळांबाबत आज, मंगळवारी निर्णय होणार आहे. राज्य सरकारने पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने १६ डिसेंबर रोजी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, शहरातील बहुतांश खासगी शाळांनी नाताळच्या सुट्टीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारपासून अनेक शाळांमधील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग गजबजले. या शाळांमध्ये दीड वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी पाऊल ठेवले. शाळांनीही दोन सत्रात शाळा भरवून एका वर्गातील विद्यार्थी या दोन सत्रांमध्ये विभागले आहेत. तसेच, जे विद्यार्थी शाळेत प्रत्यक्षात उपस्थित राहणार नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत. करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे मुंबई महापालिकेने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील शाळा बंद केल्या जाव्यात, असा आग्रह पालकांकडून धरला जात आहे. याबाबत काही पालकांनी महापौरांना निवेदन दिले आहे. 'पुण्यातील रुग्णसंख्येतील वाढ लक्षणीय असून, येत्या काळातील संभाव्य धोका बघता शाळा बंद करण्याबाबत विचार करावा लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत त्यावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल,' असे संकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. पुन्हा विद्यार्थ्यांचे हाल काही दिवसांपूर्वीच शहरातील शाळा सुरू झाल्या आहेत. खासगी शाळांप्रमाणेच महापालिकेच्या शाळांमध्ये वर्ग भरत असून पुन्हा सरसकट शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मोबाइल असे पर्याय उपलब्ध असले, तरी पालिकेच्या शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पुन्हा खंडित होण्याची भीती आहे.


source https://maharashtratimes.com/career/career-news/pune-school-shuould-be-shut-or-not-decision-to-be-taken-today/articleshow/88680914.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या