Advertisement

Internet Allowance: देशभरात करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा ऑनलाइन वर्गांना सुरुवात झाली आहे. आर्थिक मागास असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवणी घेत असताना अडचणी येतात. पण पंजाब सरकारने यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंजाबमधील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गांसाठी २ हजार रुपये इंटरनेट भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा इंटरनेट भत्ता विद्यार्थ्यांना एकदाच दिला जाईल. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारच्या कॅबिनेट बैठकीत इंटरनेट भत्त्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा सुमारे ८.६७ लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले. यासंदर्भात सीएम चन्नी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. असा मिळेल लाभ करोना महामारीचा वाढता संसर्ग पाहता महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना फक्त ऑनलाईन क्लासेस करावे लागणार आहेत. इंटरनेट सुविधेअभावी कोणताही विद्यार्थी ऑनलाइन वर्गापासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने इंटरनेट भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरनेट भत्ता मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातील बँक खात्याचा तपशील द्यावा लागणार आहे. तरुणांना मिळेल रोजगार पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास वर्षभरात एक लाख तरुणांना नोकऱ्या देऊ आणि त्यांना परदेशात जाण्यासाठी मदतीचा कार्यक्रमही सुरू करू असे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी सांगितले. तरुणांना परदेशात स्थायिक होण्यासाठी इंग्रजी भाषेच्या परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाईल असेही ते म्हणाले. करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता वैद्यकीय आणि नर्सिंग कॉलेज वगळता पंजाबमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे रात्रीचा कर्फ्यू आणि शॉपिंग मॉल्स, क्रीडा स्टेडियम आणि इतर संस्थांवर बंदी घालण्यात आली आहे. गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात नवे निर्बंध १५ जानेवारीपर्यंत लागू राहतील अशी माहिती त्यांनी दिली. पंजाबी तरुणांनी आपल्या कार्यातून परदेशातील विकासात मोठे योगदान दिले आहे. पंजाब सरकार युवकांना परदेशात स्थायिक होण्यासाठी आणि बनावट ट्रॅव्हल एजंटपासून संरक्षण देण्यासाठी एक कार्यक्रम सुरू करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
source https://maharashtratimes.com/career/career-news/internet-allowance-students-will-get-2000-rupees-internet-allowance-for-online-class-cm-channi-gave-information/articleshow/88727001.cms