Advertisement

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी महापलिका प्राथमिक शिक्षण विभागासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयानुसार आठ सहायक प्रशासन अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी सुधारित आकृतिबंधानुसार पद निर्मिती करण्यात येईल. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला दोन आणि मुख्य कार्यालयाला दोन असे एकूण १८ पर्यवेक्षक नेमले जाणार आहे. त्यापैकी सात पदे मंजूर आहेत. उर्वरित ११ पदांची निर्मिती केली जाणार आहे. महापालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत १०५ शाळा आहेत; तसेच शहरातील खासगी शाळांवर नियंत्रण ठेवावे लागते. महापालिका व खासगी शाळा यांची माहिती वेळोवेळी सरकारला लागणारी माहिती देणे, शाळांची गुणवत्ता वाढविणे, माहिती संकलित करणे आदी कामे महापालिका प्राथमिक विभागामार्फत वेळोवेळी तत्काळ करावी लागतात. या कामकाजात सुसूत्रता यावी; तसेच जलद निर्णय घेणे सोयीस्कर व्हावे यासाठी प्राथमिक शिक्षण विभागात क्षेत्रीय कार्यालयानुसार पदनिर्मिती केली जाणार आहे. नियमानुसार; तसेच सरकारकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्याचे नियोजन आहे. शिक्षकांना पदोन्नतीद्वारे संधी जिल्हा परिषदमध्ये शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी अशी पदे असतात. त्याच धर्तीवर क्षेत्रीय कार्यालयानुसार पदनिर्मिती होत आहे. याबद्दल शिक्षकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. हा आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी होणारी भरती सेवेत असलेल्या शिक्षकांमधून त्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्हता, अनुभव, शिक्षण क्षेत्रात योगदान; तसेच मनपाकडील शिक्षक कर्मचारी यामधून व्हावी. या पदनिर्मितीच्या निर्णयामुळे शिक्षकांनाही पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील आणि शिक्षण विभागातही सुसूत्रता येईल, असे शिक्षकवर्गाकडून सांगण्यात आले.
source https://maharashtratimes.com/career/career-news/pune-pimpari-chinchwad-municipal-corporation-education-department-recruitment/articleshow/89148396.cms