
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाची साथ सुरू झाल्यानंतर बंद झालेल्या टप्प्याटप्प्याने सुरू होत होत्या. मात्र जानेवारी महिन्यात तिसऱ्या लाटेच्या भीतीने पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या होत्या. या शाळा आता पुन्हा आज, सोमवारपासून सुरू होत आहेत. आजपासून पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू होत असल्याने आतापर्यंत शाळेत पाऊल न ठेवलेले विद्यार्थी प्रथमच शाळेत जाण्यास उत्सुक आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील प्रमुख शहरांतील शाळा ३ जानेवारीपासून अणि त्यानंतर ग्रामीण भागातील शाळा या बंद करून त्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू करत सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयावरून नाराजी आणि विरोध झाला. रुग्णसंख्या कमी होत असल्याने शाळा बंद करण्यापेक्षा नियोजन करून शाळा सुरू ठेवाव्यात, अशी मागणी पालक, स्वयंसेवी संस्था व शिक्षणतज्ज्ञांनी केली होती. त्यानंतर शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्यानंतर त्याला सरकारने हिरवा कंदील दिला व त्यानंतर राज्यातील शाळा आता पुन्हा सुरू होत आहेत. काही शहरांत शाळा सुरू करण्यासाठी आम्ही स्थानिक स्तरावर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्तांना स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. सध्याची परिस्थिती आणि मार्गदर्शक सूचना पाळण्याचे आदेश देत आयुक्तांनी सोमवारपासून मुंबईतील सर्व व्यवस्थापन व मंडळाच्या शाळांचे पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईतील सर्व माध्यमाच्या शाळांची घंटा पुन्हा वाजणार आहे. ऑनलाइन वर्ग कायम सध्या सुरू असलेले ऑनलाइन वर्गही कायम ठेवण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गाची सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळेत पाठविण्याबाबतचे संमतीपत्र प्राप्त करून घेण्यात यावेत, ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र प्राप्त झाले नाही अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्ययन व अध्यापनाचे कार्य सुरू ठेवावे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अध्ययन व अध्यापनासाठी शाळेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मुंबईतील शाळांसाठी काही प्रमुख सूचना - शाळामध्ये करोनाविषयक आवश्यक सर्व स्वच्छता, व सुरक्षा मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन आवश्यक - शाळा नजीकच्या महापालिका किंवा खासगी आरोग्य केंद्राशी संलग्नित करून घेणे आवश्यक - जे विद्यार्थी ऑफलाइन वर्गासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांना ऑनलाइन शिकवणी - शिक्षकमित्र, पालकमित्र, गृहभेटी अशा माध्यमांतून शिक्षण सुरू ठेवणे आवश्यक
source https://maharashtratimes.com/career/career-news/school-reopening-in-maharashtra-from-24th-january-including-pre-primary-classes/articleshow/89080027.cms
0 टिप्पण्या