
औरंगाबाद : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज, २४ जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होत आहेत. पुणे, पिंपरी, नागपूर यासारख्या अनेक जिल्ह्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय तूर्त लांबणीवर टाकला आहे. येत्या काही दिवसांत आढावा घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका स्थानिक प्रशासनांनी घेतली आहे. राज्य शासनाने नुकतीच प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली होती. मात्र हा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला होता. औरंगाबाद शहरातील दहावी, बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सोमवारपासून (ता. २४) सुरू होत आहेत. करोना पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापनांनी तयारी केली आहे. करोना प्रतिबंधात्मक लस घेतलेल्याच शाळेत प्रवेश असेल असे शाळांकडून विद्यार्थ्यांना मॅसेजद्वारे कळविण्यात आले. काही शाळांनी शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यास आधी प्राधान्य असेल, असे संकेत दिले आहेत. ग्रामीण भागात इयत्ता पहिलीपासून शाळा सुरू कराव्यात असा प्रस्ताव आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती सोमवारी याबाबत स्पष्ट करणार आहे. नाशिक शहरातील शाळा आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. ग्रामीण भागातील शाळा १०० टक्के क्षमेतेने, तर शहरातील शाळा ५० टक्के विद्यार्थी क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे १३ दिवसांच्या सुटीनंतर आज पुन्हा एकदा शहरातील पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा व ज्युनिअर कॉलेज सुरू होणार आहेत. शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह जवळपास सर्वच खासगी शाळांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय आहे. पिंपरी चिंचवड शहरातील करोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरातील शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तरी सद्य:स्थितीत करोना संसर्गाचा प्रादुर्भोव कमी होईपर्यंत शहरातील शाळा सुरु करु नयेत अशी सूचना महापौर माई ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-school-reopen-news-today-school-starting-district-from-today/articleshow/89083885.cms
0 टिप्पण्या